छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरुच राहणार- मुख्यमंत्री

सोमवारपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे.

Updated: Feb 24, 2019, 09:44 PM IST
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरुच राहणार- मुख्यमंत्री title=

मुंबई :  सोमवारपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. पुलवामा हल्ल्यानंतर चहापानाचं आयोजन करणारं सरकार असंवेदनशील असल्याची टीका करत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, आरक्षण आणि नोकरभरतीवरुन सरकारवर तोंडसुख घेतलं.

विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरुच राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच या अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्यावरही चर्चा होईल आणि ११ विधेयकं मांडली जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार २७ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील सीआरपीएफ च्या शहीद जवानांच्या कुटुंबाना ५० लाख रुपये दिले आहेत, तसंच कुटुंबातील लोकांना शासन नोकरी देणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

जानेवारी महिन्यात केंद्र सरकारनं ४ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे देण्याचं मान्य केलं आहे. राज्यानं दुष्काळ मदत वाटप सुरू केली आहे. ८२ लाख शेतकऱ्यांना दुष्काळी मदत करायची आहे. आत्तापर्यंत ४२ लाख शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसंच विम्याचे पैसेही दिले जात आहेत. आत्तापर्यंत ५१ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यातल्या ४४ लाख शेतकऱ्यांना मदत दिली आहे. १८ हजार कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. तर २४ हजार कोटी बँकांमार्फत दिले जाणार आहेत.

मागच्या सरकारनं १५ वर्षांमध्ये एक कोटी शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची नुकसान भरपाई दिली. पण आम्ही चार वर्षांमध्ये २ कोटी २६ लाख शेतकऱ्यांना १३,१३५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ईडीची भीती दाखवून भाजपनं शिवसेनेसोबत युती केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. विरोधकांच्या या आरोपांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. ईडीची भीती आमच्या मित्रपक्षांपेक्षा विरोधकांना जास्त आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच नगरची जागा भाजप लढवणार आणि जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नगरमधून राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पण राष्ट्रवादीनं या जागेवर दावा सांगितल्यामुळे नाराज सुजय विखे पाटील भाजपकडून निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरू आहेत.