पालकांमध्ये ओमायक्रॉनची भीती, या शहरांत शाळा सुरू होण्याची शक्यता कमी

Omicron News : पालकांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती आहे.  

Updated: Nov 30, 2021, 07:58 AM IST
पालकांमध्ये ओमायक्रॉनची भीती, या शहरांत शाळा सुरू होण्याची शक्यता कमी title=
संग्रहित छाया

मुंबई : Omicron News : पालकांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती आहे. (Corona new variant Omicron) त्यामुळे मुंबईतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. मुंबई महापालिका आज याबाबत निर्णय घेणार आहे. तर  राज्यात नाशिकमध्येही शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. तर नवी मुंबईत उद्यापासून काही ठिकाणी शाळा सुरु होणार नाहीत.

मुंबईत पहिली ते चौथी शाळा सुरु होण्याची शक्यता कमी आहे.  कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी शाळा सुरु करण्याबाबत मनपा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर मुंबई मनपा आज निर्णय घेणार आहे. तर नवी मुंबई काही ठिकाणी शाळा या 10 किंवा 11 डिसेंबरला सुरु होणार आहेत. पालकांची संमती असेल तर मुलांना शाळेत पाठविण्याची अट आहे. तसेच ऑनलाईन शाळा सुरु राहणार आहेत.

दरम्यान, राज्यभरात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होतील, असं आरोग्य मंत्र्यांनी म्हटले असलं तरी नाशिकमध्ये मात्र 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नाहीत. शाळा सुरू करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने पुढे ढकललाय. 10 डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नाशिक आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्यायत.  

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा उद्रेक असलेल्या 13  देशांतून गेल्या 15  दिवसांत 466 नागरिक मुंबई विमानतळावर आलेत. तर गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 1 हजार लोक मुंबईत परतले आहेत. त्या सगळ्यांचं मुंबई महापालिकेकडून ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच लसीच्या दोन डोसमधलं अंतर कमी करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली आहे.  

ओमायक्रॉनवर स्पुटनिक लस प्रभावी

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनवर स्पुटनिक लस प्रभावी असल्याचा दावा एका इन्स्टिट्यूटनं केलाय. गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटनं हा दावा केलाय. गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ही रशियातील 100 वर्ष जुनी रिसर्च संस्था आहे. मायक्रॉनविरोधात लढण्यासाठी स्फुटनिक व्ही आणि स्फुटनिक लाईट या लसी सक्षम असल्याचं या रिसर्च इन्सिट्यूटनं म्हटले आहे. स्फुटनिक लस घेणा-यांवर ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव दिसत नाही असा दावाही गमालेयाने केला आहे.