मुंबईतील आणखी एक ज्वेलर्स पळाला; ग्राहकांना कोट्यवधींचा गंडा

या ज्वेलर्सकडे जादा व्याजाच्या अमिषाने शेकडो ठेवीदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

Updated: Nov 3, 2019, 07:21 PM IST
मुंबईतील आणखी एक ज्वेलर्स पळाला; ग्राहकांना कोट्यवधींचा गंडा title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : ग्राहक आणि गुंतवणूकदारांना गुडविन ज्वेलर्सनं गंडा घातल्याचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईतल्या घाटकोपरमधील आणखी एक ज्वेलर्स ग्राहकांना गंडा घालून बेपत्ता झाला आहे. त्याने ग्राहकांचे ३०० कोटी रुपये घेऊन पोबारा केल्याचं सांगण्यात येतंय. 

घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सचं दुकान आहे. या ज्वेलर्सने शेकडो गुंतवणूकदारांकडून भिसी योजनेचे पैसे घेतले होते. शिवाय अनेकांकडून मुदत ठेवीही घेतल्या होत्या. जादा व्याजाच्या अमिषाने शेकडो ठेवीदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

पण गेल्या काही दिवसांपासून रसिकलाल ज्वेलर्समध्ये फिक्स डिपॉ़जिट परत मिळत नव्हत्या. शिवाय सोन्या-चांदिच्या दागिन्यांच्या ऑर्डरही मिळत नव्हत्या. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्यामागं तगादा लावला होता. हे सुरु असतानाच पाच ते सहा दिवसांपूर्वी ज्वेलर्स दुकानाला टाळं ठोकून पसार झाला.

  

अवघ्या पंधरा दिवसात मुंबई ठाण्यातले दोन बडे ज्वेलर्स ग्राहकांना गंडा घालून गायब झाले आहेत. आधी पीएमसी बँक आणि नंतर ज्वेलर्सकडून फसवणूक झाल्याने सामान्य गुंतवणूकदार आणि ग्राहक हवालदिल झाले.