Gokhale Bridge Barfiwala Flyover: सीडी बर्फीवाला आणि गोखले पूल जोडण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर हा पूल 1 जुलै 2024 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता आहे. हा ब्रीज खुला झाल्यानंतर अंधेरी पश्चिमपासून वेस्टर्न एक्पप्रेस वे पर्यंत जुहूपर्यंतचा 9 किमी अंतर फक्त 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. चालक वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरुन तेली गल्ली ब्रिजवरुन गोखले ब्रिज पार करुन बर्फीवाला पुलावरुन थेट जुहूपर्यंत पोहचू शकणार आहेत. सध्या हे 9 किमीपर्यंतचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना 45 मिनिटांचा वेळ लागतो. तेच अंतर पुल खुला झाल्यानंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी गोखले पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, गोखले पूल आणि अंधेरी पूर्वमधील बर्फीवाजा ब्रिज या दोन पुलांमध्ये जवळपास दीड मीटरचे अंतर होते. त्यामुळं महानगरपालिकेला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.
गोखले पुल आणि बर्फीवाला या दोन पुलांतील अंतर पाहता या दोन्ही पुलांच्या अलाइनमेंटसाठी बीएमसीने आयआयटी मुंबई, व्हीजेटीआयकडून सर्वेक्षण केले होते. त्यानंतर दोन्ही पुलांना जोडण्याचे काम सुरू झाले. ते जोडण्यासाठी बीएमसीने 9 कोटी रुपये खर्च केले आहेत. अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूलाच्या समांतर पातळीवर जुळवण्यासाठी हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करून पूर्ण करण्यात आले आहे. याअंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे.हा उड्डाणपूल सुरू झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होणार असून पश्चिम द्रुतगती मार्गावर येण्यासाठी वाहनचालकांना सुकर होणार आहे.
बर्फीवाला आणि गोखले उड्डाणपुलाच्या जोडणीच्या गर्डरच्या काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यात पार पडले. या कामानंतर सहा तास पाऊस पडला नाही पाहिजे, ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी शेडची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून पाऊस पडला तरी कोणतीही अडचण येऊ नये. मात्र, तब्बल 12 तास पाऊस नसल्याने कामात कोणतीही अडचण निर्माण झाली नव्हती. आता काँक्रीटीकरणाचे काम जलदगतीने पार पाडण्यासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट वापरण्यात येणार असून, त्यानंतर २४ तासांत पुलावर 'लोड टेस्ट' घेण्यात येणार आहे.
बर्फीवाला उड्डाणपूल व गोखले पूल यावरुन झालेल्या वादानंतर बीएमसीने हे दोन्ही पूल जोडण्याचे काम वेगाने सुरू केले होते. सध्या एका भागाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दुसऱ्या भागाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल. बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, १ जुलै रोजी गोखले-बर्फीवाला पूल सुरू केल्यानंतर गोखले पुलाच्या दुसऱ्या भागाचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, पुलाचा दुसरा भाग ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. त्याचे 50% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. हा गोखले पुलाचा दक्षिणेकडील भाग आहे. पुलाचा हा भाग सुरू झाल्याने पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा ताण बऱ्याच अंशी कमी होणार आहे.