मुंबई: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने फरार घोषित केलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तीन मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरात या मालमत्ता आहेत. येत्या ९ ऑगस्टला या मालमत्तांचा लिलाव होणार आहे.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान पार पडणार आहे. त्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये निविदापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. ७९ लाख ४३ हजार अशी राखीव किंमत ठेवण्यात आली असून या किंमतीपुढे बोली लागणार आहे.
या लिलावात सहभाग घेणाऱ्यांना ६ ऑगस्टपर्यंत २५ लाख अनामत रक्कम भरावी लागणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. दाऊदची ही मालमत्ता ई-लिलाव, जाहीर लिलाव आणि बंदिस्त निविदीच्या माध्यमातून लिलावात काढण्यात येईल. या लिलावात कोण कोण बोली लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी २०१५मध्ये पाकमोडिया स्ट्रिटवरील दाऊदच्या दिल्ली जायकासाठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी एकाने ते हॉटेल ४ कोटी २८ लाखांची बोली लावून खरेदी केले होते. मात्र, किमान रक्कम जमा करू न शकल्यामुळे अर्थमंत्रालयाने ती मालमत्ता पुन्हा ताब्यात घेतली होते.