ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला अखेर राज्यपालाची मंजुरी

ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला राज्यपालाची मंजुरी मिळाल्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.   

Updated: Feb 1, 2022, 06:30 PM IST
ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला अखेर राज्यपालाची मंजुरी title=

मुंबई : हिवाळी अधिवेशनात सदस्यांनी एकमताने मंजूर केलेल्या ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकावर त्यांनी सही केल्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हिवाळी अधिवेशनात सभागृहात सर्व सदस्यांनी एकमताने ओबीसी राजकीय आरक्षण विधेयक मंजूर केले होते. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, या विधेयकावर राज्यपाल कोश्यारी यांनी सही केली नव्हती. 

आज आघाडी सरकारच्या नेत्यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांनी या विधेयकावर सही केली होती अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, त्यांनी राज्यपाल यांचे आभार मानत या विधेयकावर सही केल्यामुळे हा विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.