बैठक संपली... राज्यपालांनी अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

कोरोनाच्या नादात इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय होता कामा नये. 

Updated: May 20, 2020, 10:51 PM IST
बैठक संपली... राज्यपालांनी अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना title=

मुंबई: कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज संध्याकाळी बैठक बोलावली होती. काहीवेळापूर्वीच ही बैठक संपली असून यानंतर राज्यपालांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्याचे समजते. जून आणि जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेला आणखी सक्षम करा. त्यासाठी कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देण्याचा विचार करावा. जेणेकरून या आव्हानाला तोंड देता येईल. तसेच कोरोनाच्या नादात इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी विशेष खबरदारी घ्या, असे राज्यपालांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

यावेळी राज्यपालांनी कोरोना आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.  मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी मुंबईतील कंटेन्मेंट झोनसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे राज्यपालांसमोर सादरीकरण केले. 

'राज्यपालांना त्रास देऊ नका, त्यापेक्षा...', जयंत पाटलांचा भाजपला टोला
 
यानंतर राज्यपालांनी रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केली. तसेच कोरोना विरुध्दच्या लढाईत आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासनाने विचार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. 

उद्धव ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

या बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल  तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आरोग्यव्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णसंख्या लपवली जात आहे. मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचं पालन होत नाही. राज्यातील सरकरा पूर्णत: अपयशी ठरलं आहे, असे या शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले होते.