मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षासाठीसुद्धा मुंबईत गणेशोत्सवाची धूम नेमकी कशी असणार याची उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. अर्थात या उत्सुककतेमध्ये Coronavirus कोरोना व्हायरसमुळे उदभवलेल्या संकटाचं सावटही आहे. हीच एकंदर परिस्थिती आणि झपाट्याने होणारा कोरोनाचा फैलाव पाहता मुंबईतील अतिशय प्रसिद्ध आणि श्रीमंत गणेशोत्सव मंडळांपैकी एक असणाऱ्या जीएसबी गणेशोत्सव मंडळाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील वडाळा येथे असणाऱ्या द्वारकानाथ भवन राम मंदिरातील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून याविषयीची माहिती देण्यात आली.
मंदिर न्यास सचिवांच्या नावे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकामध्ये समितीचा हा स्तुत्य निर्णय जाहीर करण्यात आला. 'कोविड 19 या वैश्विक महामारीमुळे उदभवलेली एकंदर परिस्थिती पाहता आमच्या स्वामीजींच्या मार्गदर्शनाअंतर्गत यंदाचा गणेशोत्सव पुढे ढकलल्याचा निर्णय घेण्यात आला आहे', असं या पत्रकात नमूद करण्यात आलं.
वाचा : भारतातील कोरोना प्रादुर्भावाबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी
भाद्रपदातील गणेश चतुर्थीला राम मंदिर वडाळा येथील गणेशोत्सव आयोजित केला जाणार नसून, पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२१ मध्ये येणाऱ्या माघ गणेश चतुर्थीला या उत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. सामाजबांधव आणि दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांसमवेत सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सध्या वडाळ्यातील गणेशोत्सव मंडळाच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.