Hijab Row : राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा - गृहमंत्री

karnatak Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी इशारा दिला आहे. 

Updated: Feb 11, 2022, 01:03 PM IST
Hijab Row : राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा - गृहमंत्री title=

मुंबई : karnatak Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी इशारा दिला आहे. पोलीस विभागाचे काम वाढवू नका, असे सांगत गृहमंत्री वळसे-पाटील यांनी राजकीय पक्षांना दिली तंबी आहे. राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा, असे यावेळी आवाहन केले.

हिजाबवरून राज्यातील वेगवेगळ्या भागात जे आंदोलन सुरू आहे त्याबाबत गृहविभागाने पूर्ण तयारी केली आहे. सर्व प्रमुख अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करा, असे स्पष्ट आदेश  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. त्याचवेळी जर आंदोलन झाले तर ते शांततेत पार पाडा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी त्यांनी राजकीय पक्षांना आंदोलनाबाबत तंबी दिली. जे मी सामान्य नागरिकांना सांगितले तेच राजकीय पक्षांनाही सांगत आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून शांतता विघडवू नका आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

जाती-जातीमध्ये किंवा धर्मा-धर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करु नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे, असे वळसे-पाटील म्हणाले.