ओम देशमुख, झी २४ तास, मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. तेव्हा संघाच्या मुखपत्राने निकालाची चिरफाड केली होती. भाजपला धारेवरही धरलं होतं.. महाराष्ट्रात पुरेसं यश न मिळाल्याची कारणमिमांसा करण्यात आली होती. आता मुंबईतल्या काही भाजप आमदारांवर संघाची खप्पामर्जी झाल्याचं समजतंय.. कोअर मुद्दे आणि हिंदुत्ववादी अजेंड्याला बाजूला सारून काम करणाऱ्या पदाधिकारी आणि आमदारांची संघाकडून कान उघडणीही करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसलीय..मात्र त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अॅक्शन मोडवर आलाय.. अशातच मुंबई भाजपमधल्या काही नेत्यांच्या कार्यशैलीवर संघाची नाराजी असल्याचं दिसून आलंय. भाजपच्या विद्यमान 4 ते 5 आमदारांवर संघ नाराज असल्याचं समजतंय.. संघाचे कोअर मुद्दे आणि हिंदुत्वाच्या अनेक विषयावरून संघ मुंबईतील भाजपच्या काही आमदारांवर नाराज आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, व्होट जिहाद सारख्या मुद्द्यांवर भाजपचे नेते आग्रही भूमिका मांडत असताना काही आमदारांनी मात्र या मुद्द्यापासून अलिप्त राहणे पसंत केलंय.. तसंच लोकसभा निवडणुकीत संबंधित आमदारांच्या खराब कामगिरीवरुनही संघाची नाराजी असल्याचं समजतंय.
दक्षिण मुंबईत संघाची बैठकसुद्धा पार पडली. तेव्हा संघाच्या वरिष्ठांनी काही प्रमुख मुद्द्यांवरुन भाजप नेत्यांची खरडपट्टी काढल्याची माहिती समोर आली आहे.. दक्षिण मुंबईमधील पदाधिकारी, नेत्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात संघ पुढे सरसावला आहे. संघाच्या वाढत्या महत्त्वामुळे काही बड्या नेत्यांना घरचा रस्ताही दाखवला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरियाणामध्ये भाजपच्या 10 वर्षांच्या सत्तेला काँग्रेस सुरूंग लावू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. दुसरीकडे जम्मू काश्मिरमध्येही नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचू शकते, असं आकडे सांगतायत. एक्झिट पोलचे आकडे सत्यात उतरले तर भारतीय जनता पक्षाला लोकसभेपाठोपाठ दुसरा मोठा धक्का बसेल. पण या दोन राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम येऊ घातलेल्या महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या तीन राज्यांवरही पडणार आहे, त्यामुळे तर भाजपची चिंता आणखी वाढणार आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या निकालानंतर केंद्रातलं सरकार बदलणार असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात केलं होतं.महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुका तोंडावर असल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय. हरियाणासोबत जम्मू काश्मिरमध्ये भाजपला फटका बसल्यास त्याचे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही पडसाद उमटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे हरियाणा गेल्यास महाराष्ट्रसुद्धा भाजपच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल हरियाणाचा असला तरी टेन्शन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसतंय.