Chembur Fire : मुंबईतील चेंबूरमध्ये एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली. सिद्धार्थ कॉलनीत ही दुर्घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत घरातील लोकांना बाहेर काढलं. मात्र, या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. घर पेटत होत आणि मदत करणारेच घरं लुटत होते.
6 ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात गुप्ता कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीत या कुटुंबातील सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. एकीकडे संपूर्ण मुंबई या घटनेने हळहळत असताना दुसरीकडे ही आग विझविण्याच्या बहाण्याने आत आलेल्या कोणीतरी या घरातील लाखोंच्या एवजावर डल्ला मारण्याचे अमानवी कृत्य केले आहे. या घरातील तिजोरी मध्ये सुमारे साडे चार लाख रोख रक्कम आणि आणि 100 ग्रॅम इतके सोने होते.
या कुटुंबातील सदस्यांनी या तिजोरीतील कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी या घरात प्रवेश केला असता सदरची तिजोरी तोडलेल्या अवस्थेत आणि त्यातील एवज चोरीला गेलेल्या अवस्थेत आढळून आले. या बाबत या कुटुंबाने आज चेंबूर पोलिसांना तक्रार अर्ज करुन या दागिन्यांचा शोध घेण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. तसेच हे घर उभे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी आज कोणीही अधिकारी या बाबत त्यांच्याकडे फिरकले नसल्याचे या कुटुंबाचे म्हणणे आहे.
घरात सुखशांती नांदावी यासाठी देवघरात पुजेचा दिवा लावला जातो. पण मुंबईतल्या चेंबूरमधील गुप्ता कुटुंबासाठी पूजेचा दिवाच काळ बनलाय. देवघरातल्या पूजेचा दिवा कोसळून लागलेल्या आगीत सिद्धार्थनगरमधील गुप्ता कुटुंबातल्या सात सदस्यांचा मृत्यू झालाय. गुप्ता कुंटुंब तळमजला अधिक दोन माळे अशा घरात वास्तव्य करत होते. पहाटेच्या सुमारास तळमजल्यावरील दुकानात दिवाबत्तीचा दिवा लावण्यात आला. हा दिवा कलंडल्यानंतर आग लागली. ही आग काहीवेळातच भडकली.
तळमजल्यावर लागलेली आग वरच्या दोन्ही मजल्यावर पसरली. वरच्या मजल्यावर झोपलेल्या सात सदस्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. फायरब्रिगेडच्या जवानांनी आग अटोक्यात आणली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.