मुंबईला वाढत्या कोरोनाचा धोका, पालिका रूग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा

शहरावर कोरोनाचा (Mumbai Corona) धोका घोंगावत असताना औषधांबाबत पालिका दरबारी सुरु असलेला लालफितीच्या कारभाराचा फटका मात्र सर्वसामांन्याना सहन करावा लागतोय. 

Updated: Jun 4, 2022, 04:50 PM IST
मुंबईला वाढत्या कोरोनाचा धोका, पालिका रूग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा title=

कृष्णात पाटील, ,झी मीडिया, मुंबई : शहरासह राज्यात आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेसह राज्य सरकारही सतर्क झालंय. राज्य सरकारने बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती केलीय. तर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर ऐच्छिक ठेवलाय. एका बाजूला प्रशासन सतर्क असल्याचं दिसतंय. मात्र दुसऱ्या बाजूला पालिका प्रशासनाच्या अनास्थेचं दर्शन झालंय. (huge shortage of antibiotic anaesthesia saline and more medicines in lokmanya tilak muncipal sion hospital on corona backdrop)

मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात (Sion Hospital)औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अधिकचे पैसे मोजून खासगी औषधालयातून औषधं विकत घ्यावी लागत आहेत.

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक जण उपचारांसाठी सायन रुग्णलयात येतात. मात्र रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दमछाक करावी लागतेय. तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. 

या औषधांचा तुटवडा

अँटिबायोटिक ड्रग्ज आणि गोळ्या, सलाईन, एनास्थेशियाकरता लागणारी ट्यूब, आणि ड्रेसिंग मटेरियलचा तुटवडा असल्याचं समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजेच ड्रेसिंगसाठी लागणारी चिकटटेप तर दोन वर्षांपासून नाही.  सर्जरीकरता डॉक्टर,नर्सेसना लागणा-या कपड्यांचा नियमित पुरवठा होत नसल्याचं समोर आलंय.

औषधांच्या तुटवड्यामागील कारण काय?  

स्थानिक पातळीवर औषध खरेदीसाठी जादा दर मोजावे लागतायेत. त्यामुळे औषध खरेदी होत नाहीये. तसंच रूग्णांची संख्या जास्त असल्यानं स्थानिक पातळीवर खरेदी केलेली औषधे पुरत नसल्याचा दावा रुग्णलाय प्रशासनाकडून करण्यात आलाय.

तसेच पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडून औषध खरेदीची निविदा प्रक्रिया रखडल्यानं ही समस्या उद्भवल्याचं म्हटलं जातंय. शहरावर कोरोनाचा धोका घोंगावत असताना औषधांबाबत पालिका दरबारी सुरु असलेला लालफितीच्या कारभाराचा फटका मात्र सर्वसामांन्याना सहन करावा लागतोय.