Husband Girlfriend Not a Relative: मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये फार महत्त्वाचा निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने एका व्यक्तीच्या गर्लफ्रेण्डविरोधात पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. पत्नीने घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली पतीच्या गर्लफ्रेण्डविरोधात तक्रार दाखल केली होती. द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. गर्ल्डफ्रेण्ड ही नवऱ्याची नातेवाईक नसल्याने तिच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांसाठी तिला दोषी धरता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.
सदर प्रकरणामध्ये या नवऱ्याच्या गर्लफ्रेण्डविरुद्ध केवळ एकच आरोप होता तो म्हणजे या महिलेच्या पतीबरोबर तिने विवाहबाह्य संबंध ठेवले होते. आपल्या पत्नीने आपल्याला घटस्फोट द्यावा यासाठी हा नवरा प्रयत्न करत होता. पत्नीने घटस्फोट दिल्यानंतर गर्लफ्रेण्डबरोबर लग्न करण्याचा या व्यक्तीचा मानस होता, असं तक्रारदार पत्नीने म्हटलं आहे.
सदर प्रकरणामधील पती-पत्नीचं जुलै 2016 मध्ये लग्न झालं आहे. पत्नीने डिसेंबर 2022 मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या सुरगणा पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध कलम 498 ए (पती आणि पतीकडून होणार छळ), 406 (विश्वासघात), 323 (जाणीवपूर्वक त्रास देणे), कलम 506 आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल केले. पतीने आणि पतीच्या कुटुंबियांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा दावा या महिलेने केला होता.
या प्रकरणामध्ये नवऱ्याच्या गर्लफ्रेण्डच्या नावाचा उल्लेखही तक्रारदार महिलेने एफआयआरमध्ये केला होता. नवऱ्याच्या गर्लफ्रेण्डची बाजू वकील अभिषेक कुलकर्णी आणि सागर वकाळे या दोघांनी मांडली. गर्लफ्रेण्ड ही काही पतीच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक नाही, असा युक्तीवाद नवऱ्याच्या गर्लफ्रेण्डच्यावतीने करण्यात आला. कुलकर्णी यांनी एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेल्या दाव्यांकडे न्यायालयाचं लक्ष वेधून घेताना पतीचे गर्लफ्रेण्डबरोबर विवाहबाह्य संबंध असून त्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणं होतात असं म्हटलं होतं. या महिलेने केलेल्या दाव्यानुसार तिच्या पतीला त्याच्या गर्लफ्रेण्डकडून व्हॉट्सअप मेसेज येतात. तसेच महिलेच्या पतीला गर्लफ्रेण्डबरोबर लग्न करण्याची इच्छा असल्याची शंका या महिलेला असल्याचंही तक्रारीतून दिसून येत असल्याचं, वकील कुलकर्णी यांनी न्यायालयाला सांगितलं.
Bombay High Court quashes FIR against husband's girlfriend saying she is not relative
A two-judge bench of the Bombay High Court quashed an FIR against the girlfriend of a man whose wife had roped her as an accused in a domestic case.
(@journovidya)https://t.co/Fn8NGtfx9c
— Law Today (@LawTodayLive) January 25, 2024
"एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या आरोपांकडे पूर्णत्वाने पाहिलं तरी त्यामधून गर्लफ्रेण्डने काही दखलपात्र गुन्हा केला आहे असं म्हणता येणार नाही," असं खंडपीठाने म्हटलं. "या अशा प्रकरणामध्ये तिच्याविरुद्ध (नवऱ्याच्या गर्ल्डफ्रेण्डविरुद्ध) गुन्हेगारी स्वरुपाचा खटला चावणे हा कायद्याचा दुरुपयोग ठरेल," असं निरिक्षणही कोर्टाने नोंदवलं. न्यायालयाने गर्लफ्रेण्डविरुद्धची एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले. घरगुती हिंसाचारासंदर्भातील हा एक फार महत्त्वाचा निकाल ठरला आहे.