पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : सध्याच्या घडीला शेतात अति प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढल्याने मातीची गुणवत्ता सतत खालावत आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतोय. मात्र, सध्याच्या काळात शेतीबाबतही नवनवीन पर्याय समोर आले आहेत. यातील सर्वात उत्तम पर्याय म्हणजे हायड्रोपोनिक शेती.
भारतातील शेती मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या स्वरुपात असल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीची कमतरता जाणवत आहे. अनेक शेतकरी जमिनीअभावी शेती करु शकत नाही. अशा शेतकऱ्यांना आता शेती करुन पैसे कमवता येणार आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान पद्धतीत शेतीमध्ये मातीचा वापर न करता आधुनिक पद्धतीने शेती केली जाते.
हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. या पद्धतीमध्ये रोपाची वाढ होईपर्यंत मातीची आवश्यकता नसते. हायड्रोपोनिक शेती वाळू आणि खड्यांमध्ये फक्त पाण्याने केली जाते.
शेतीसाठी जास्त जागेची गरज नाही
हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची गरज लागत नाही. शेतीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचा खर्चही कमी होतो. वाळू आणि खडे मध्ये तुम्ही ही शेती करु शकता. तसेच फक्त पाणी घेऊन त्याची लागवड केली जाऊ शकते. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत शेतीचा खर्च कमी होतो. यामध्ये शेतीसाठी वनस्पतींच्या वाढीमध्ये हवामानाची विशेष भूमिका नाही. अशा प्रकारे लागवड करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेचीही गरज नाही.
अशी करा शेती
हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी तुम्हाला एक सेटअप तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही ते एक किंवा दोन प्लांटर सिस्टीमने सुरू करू शकता. सर्वात आधी तुम्हाला पहिले कंटेनर किंवा मत्स्यालय घ्यावे लागेल. ते एका पातळीपर्यंत पाण्याने भरुन ठेवा. त्यानंतर या सेटअपच्या आत एक लहान मोटर ठेवाली लागेल. जेणेकरून पाण्याचा प्रवाह आत राहील. कंटेनरच्या तळाशी असलेल्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये छिद्र करा. यामध्ये तुम्ही लहान भांडी बसवा. भांड्याच्या आतील बाजूस सर्व बाजूंनी कोळशाने झाकून ठेवा. त्यानंतर भांड्यात नारळाची पूड टाकून त्यावर बिया टाका.
अनेक पिके घ्या
हायड्रोपोनिक शेतीतून तुम्ही अनेक पिक घेऊ शकता. यामध्ये कोबी, पालक, स्ट्रॉबेरी, सिमला मिरची, चेरी टोमॅटो, तुळस, लेट्यूस यासह इतर अनेक भाज्या आणि फळे तयार करू शकता. हे तुम्ही एक किंवा दोन प्लांटर पद्धतीने सुरू करु शकता. या तंत्राने मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी 10 ते 15 प्लांटर सिस्टीम तुम्हाला बसवता येतील.
परदेशी भाज्या, फळे देखील पिकवा
परदेशात जी झाडं उगवली जातात त्याचे उत्पादनही हायड्रोपोनिक शेतीतून करता येते. यामध्ये कोणत्याही वनस्पतींची लागवड करू शकता. विशेष म्हणजे मातीच्या कमतरतेमुळे ही झाडे लवकर कोणत्याही रोगाला बळी पडत नाहीत. त्यामुळे कोणताही रोग न लागल्याने पिकांची वाढ देखील मोठ्या प्रमाणात वेगाने होते.