'मी पुन्हा येईन' हा माझा गर्व नव्हता- देवेंद्र फडणवीस

मी कधीही स्वत:च्या नव्हे तर पंतप्रधान मोदीजी यांच्या नावावर मते मागितली.

Updated: Dec 7, 2019, 05:58 PM IST
'मी पुन्हा येईन' हा माझा गर्व नव्हता- देवेंद्र फडणवीस

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील 'मी पुन्हा येईन' ही घोषणा म्हणजे माझा गर्व नव्हता, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला का, या प्रश्नाला उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, 'मी पुन्हा येईन' ही कवितेची साधीशी ओळ आहे. विधानसभेतील भाषणात मी त्याचा उल्लेख केला होता. लोकांना ही ओळ भावली त्यामुळे सर्वत्र पसरली. 'मी पुन्हा येईन'ला कुठेही गर्वाचा दर्प नव्हता. जनतेची सेवा करण्यासाठी 'मी पुन्हा येईन' अशी माझी भावना होती. गेल्या पाच वर्षांमध्ये मी एकही सुट्टी न घेता जनतेची सेवा केली. याबाबत मी समाधानीही आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात 'पैलवान कोण' यावरून जुगलबंदी रंगली होती. यासंदर्भातही देवेंद्र यांनी मुलाखतीदरम्यान भाष्य केले. मी शरद पवार यांना सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीसला आपली क्षमता माहिती आहे. मी कधीही स्वत:च्या नव्हे तर पंतप्रधान मोदीजी यांच्या नावावर मते मागितली. मी कायमच स्वत:च्या मर्यादा आणि क्षमता समजून काम केले, असे फडणवीस यांनी म्हटले.

तसेच महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर प्रसारमाध्यमांकडून भाजप हरलाय, असे चित्र निर्माण केले जात आहे. आम्ही ७० टक्के मते मिळवली आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला होता. मात्र, ४४ टक्के मते मिळवणारे एकत्र येऊन संख्याबळात आम्हाला मात दिली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.