उद्धव ठाकरे घेणार लालकृष्ण अडवाणींची भेट

हे नेते केवळ तोंडी हिंदुत्त्व मानणारे नव्हते, तर त्याचे आचरण करणारे होते.

Updated: Nov 10, 2019, 03:20 PM IST
उद्धव ठाकरे घेणार लालकृष्ण अडवाणींची भेट

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ऐतिहासिक अशा अयोध्या खटल्याचा निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी न्यायदेवतेचे आभार मानत एका नवीन पर्वाला सुरुवात होत असल्याचे सांगितले. 

विशेष म्हणजे यावेळी उद्धव यांनी राम मंदिर आंदोलनावेळी रथयात्रा काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आवर्जून उल्लेख केला. लवकरच मी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानेन. अडवाणीजींना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यायला नक्कीच आवडेल, असे उद्धव यांनी म्हटले. सध्या भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य सूचक असल्याचे मानले जात आहे. 

अयोध्या निकालाचा आनंद पण.... संभाजी भिडेंची प्रतिक्रिया

या पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचाही उल्लेख केला. हे नेते केवळ तोंडी हिंदुत्त्व मानणारे नव्हते, तर त्याचे आचरण करणारे होते, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. या निर्णयात सरकारचे श्रेय आहे किंवा नाही, हे मी सांगू शकत नाही. परंतु, न्यायदेवतेचे श्रेय निश्चितच आहे. यानिमित्ताने सगळ्यांनी जो समजुतदारपणा दाखवला, तो नेहमी दाखवला तर भारत देश महाशक्ती होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

करतारपूर कॉरिडोर उद्घाटनाप्रसंगी मनमोहन सिंह आणि 'सरदार' मोदी यांची भेट

अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हिंदूंच्या भावनेला न्याय मिळाला. गेल्यावर्षी २४ नोव्हेंबरला मी अयोध्येत गेलो होतो. तेव्हा मी शिवनेरी किल्ल्यावरची माती अयोध्येला नेली होती. या मातीने काहीतरी चमत्कार घडले, असे मला वाटतच होते आणि माझ्या दौऱ्याला वर्ष होण्यापूर्वीच अयोध्येचा निकाल आला, असे उद्धव यांनी सांगितले.