श्वेता वाळंज, झी मीडिया, मुंबई : 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ...' लहानपण कोणाला आवडत नाही?.. आजच्या धकाधकीच्या जीवनात शिल्लक आहेत त्या म्हणजे लहानपणीच्या गोड आठवणी. या आठवणींच्या शिदोरीमधील शाळेतले ते सोनेरी दिवस कोणताच विद्यार्थी त्याच्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आपल्या याच अठवणींना उजाळा देण्यासाठी 'आयईएस' शाळेच्या विद्यार्थांनी Reunion ही संकल्पना आमलात आणली.
१९९४ सालच्या विद्यार्थांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कार्यक्रमाचे आयोजन केले. शाळेचे शिक्षक, शिपाईंसह एकूण २७० विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते. प्रसन्न भेंडे, नितीन साळवी, सिमीत गुप्ते, मेहुल पारीख, ऋषिकेश गुजर आणि आजित भोसले यांचा या कार्यक्रमात खारीचा वाटा होता. त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती हजारी आणि ट्रस्टी सतीश नायक, सतीश लोटलीकर यांनी देखील विद्यार्थांना सहकार्य केले.
पूर्वी 'आयईएस' असं नाव असलेल्या शाळेचं नाव आता व्ही.एन सुळे असं झालं आहे. शाळेच्या नावात बदल झाला असला तरी अठवणी मात्र कधीच बदलत नाहीत. तब्बल २५ वर्षांनंतर शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र आले. फक्त शिक्षक आणि विद्यार्थांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला नाही तर शाळेच्या शिपयांना देखील या माजी विद्यार्थांनी बोलावले होते. सोशल मीडियावर सक्रिय नसल्यामुळे शाळेतल्या शिपाई काकांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करणं विद्यार्थांसाठी फार आव्हानात्मक होते.
पण अनेक प्रयत्नांनंतर शिपाई काकांचा शोध शाळेच्या विद्यार्थांनी घेतला. एवढचं नाही तर शाळेच्या शिपाई काकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात. यावेळी शिपाई काकांचा कंठ दाटून आला.
अशात सोशल मीडियाचे आभार मानावे तेवढे कमीच. कारण माजी विद्यार्थ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिक्षकांचा शोध घेतला. काही शिक्षकांच्या घरी जावून विद्यार्थांनी त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले.
शाळेच्या या माजी विद्यार्थांनी एकूण ७० शिक्षकांसोबत संपर्क साधला. त्यापैकी ४० शिक्षकांच्या उपस्थित हा कार्यक्रम शाळेच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. तर शिक्षकांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत मोठ्या आदराने विद्यार्थांनी शिक्षकांचे स्वागत केले.
तब्बल २५ वर्षांनंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थांना देखील त्यांचे अश्रू अनावर झाले. शिक्षकांचं प्रेम, आशीर्वाद पुन्हा मिळतील म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दहावी संपली आणि महाविद्यालयीन जीवनाचा प्रवास सूरू झाला.
कधी मोठा वाटणारा शाळेचा वर्ग आणि बाक आता लहान वाटू लागला. शाळेत केलेली धम्माल, शिक्षकांना दिलेला त्रास तर शिक्षकांकडून मिळालेली शाबासकीची थाप... विशेष म्हणजे शाळेत झालेलं पहिलं प्रेम आणि बरचं काही... जीवनातल्या कित्येक गोष्टींची सुरूवात झाली ती म्हणजे शाळेतून. शाळेसोबत जोडलेल्या असंख्य अठवणी त्या दिवशी पुन्हा नव्याने ताज्या झाल्या आणि सूर्य मावळताच त्या अठवणी कायम स्मरणात राहिल्या. २०२० मध्ये अनुभवलेला १९९४ सालचा तो क्षण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बरचं काही देवून गेला.