Maratha Reservation : लेखी येत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, संभाजीराजेंचा निर्धार

मुख्यमंत्री आणि शिष्ठमंडळात सकारात्मक चर्चा, राज्यसरकार सर्व मागण्या मान्य करणार?

Updated: Feb 28, 2022, 05:28 PM IST
 Maratha Reservation : लेखी येत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, संभाजीराजेंचा निर्धार title=

मुंबई :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) उपोषणाला बसले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात हे उपोषण सुरु असून उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान 18 मराठा समन्वयक आणि 2 विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.

मुख्यमंत्री आणि शिष्ठमंडळात झालेल्या चर्चेची माहिती समन्वयकांनी संभाजीराजेंना दिली. मुख्यमंत्री आणि शिष्ठमंडळात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. पण जोपर्यंत सरकारकडून लेखी येत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

आरक्षणाचा लढा हा दिर्घकालन आहे. पण सामान्यांचे प्रश्न सुटणं गरजेचं आहे. त्यासाठी मुक आंदोलन करायचं आम्ही ठरवलं. मुक आंदोलन यासाठी की कोव्हिडची महामारी वाढत होती.

ज्या समाजाने आपल्या भावना 2016 मध्ये दाखवून दिलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा समाजाला वेठिस धरावं  का, समन्वयकांना वेठीस धरावं का, असा प्रश्न होता. 

म्हणून पहिलं मुक आंदोलन आम्ही कोल्हापूरात घेतलं १६ जूनला, १७ जुनला सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलावलं. आम्ही मराठा समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. गरीब मराठ्यांवर किती अन्याय होत आहे, हे आम्ही सांगितलं.

सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्यांनी चर्चेला बोलावलं. अनेक लोकांनी म्हटलं होतं, की लगेच जायला नको हे सर्व मॅनेज होईल. त्यांनी सांगितलं आम्ही १५ दिवसांत सर्व विषय मार्गी लावतो. पण दोन महिन्यांनंतरही ते विषय मार्गी लागलेले नाहीत.

म्हणून मी स्वतंत्र निर्णय घेतला अन्यायाविरोधात लढा देण्याचं मी माझं कर्तव्य समजतो. म्हणून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. जो पर्यंत सरकारकडून लेखी येत नाही तोपर्यंत मी मान्य करणार नाहीए, तुम्ही सर्वांनी शांत आंदोलन करा, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.