Monsoon In Maharashtra: उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मान्सून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून अपेक्षापेक्षा लवकर केरळात दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. उकाड्याने होरपळून निघालेल्या नागरिक चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. देशातील काही भागात मान्सूनपूर्व सरीदेखील बरसल्या होत्या. तर, अलीकडेच आलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, 4 जूनरोजी पुण्यात मान्सूनपूर्व सरी बरसणार आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात पूर्व मोसमीसाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळं जून रोजी पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. सोमवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. तसंच, 4 जूनला नैऋत्य मोसमी वारे तळकोकणात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 2-4 जून दरम्यान पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
हवामान विभागाने आता दिलेल्या माहितीनुसार, मान्सून केरळमधून आता कर्नाटकात दाखल झाला आहे. सध्या मान्सून तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यात पोहोचला असून येत्या 10 जूनला मान्सून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर काहीच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे. तर, मुंबईतही 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा मुंबईत पावसाचं आगमन वेळेवर होणार असून पावसाचे प्रमाणदेखील समाधानकारक असणार आहे.
आज नैऋत्य मान्सून दक्षिण कर्नाटकात पोहोचला असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, एर्नाकुलम आणि इडुक्कीसह सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आजही मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) 2024 या कालावधीत संपूर्ण देशभरात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. संपूर्ण देशभरात मान्सूनचा हंगामी पाऊस ± 4% च्या मॉडेल त्रुटीसह दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 106% असण्याची शक्यता. मध्य भारत व दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ ,उदगीर, करडखेल या भागात अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला आहे. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.