मुंबई : विशाखापट्टम वर्गातील तिसऱ्या विनाशिकेचे आयएनएस इंफाळचे आज नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईतील माझगाव गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले. जलावतरण वेळी आयएनएस इंफाळचे वजन हे 3027 टन एवढे होते. यापुढच्या काळांत या युद्धनौकेवर विविध यंत्रणा, विविध युद्धसामग्री बसवल्या जातील, त्यानंतर विविध चाचण्यांनंतर 2023 मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.
याआधी विशाखापट्टम वर्गातील आयएनएस विशाखापट्टम आणि आयएनएस मोरमुगावो या दोन युद्धनौकांचे जलावतरण झाले असून त्यावर विविध यंत्रणा आणि युद्धसामग्री बसवण्याचे काम सुरू आहे. या विशाखापट्टम वर्गातील युद्धनौका 2021 पासून नौदलात दाखल व्हायला सुरुवात होतील, त्यावेळी त्या जगातील एक अत्याधुनिक युद्धनौकांपैकी म्हणून ओळखल्या जातील, नौदलाच्या ताकदीमध्ये यामुळे मोठी भर पडणार आहे.