अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : भंगारात जाण्यासाठी आज आयएनएस विराटचा अखेरचा प्रवास सुरू झालाय. भारताची एकेकाळची शान असलेली, नौदलातील २१ वर्षांच्या सेवेनंतर विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट ६ मार्च २०१७ ला निवृत्त झाली. तेव्हापासून विराट मुंबईत नौदलाच्या तळावरच उभी होती. अखेर आज विराटला टो करून मुंबईतील नौदलाच्या तळाबाहेर काढण्यात आलं.
विराट आता गुजरातच्या अलंग या जहाज तोडणी बंदरात जात आहे. विराटचं सागरी युद्धस्मारकात परिवर्तन करण्याचं स्वप्न भंगल्यावर अखेर विराटची तोडणी होणार आहे. विराट ही नौदलाच्या तळावर भली मोठी जागा व्यापत असल्याने तिथे इतर युद्धनौकांना उभं राहण्यासाठी जागा नव्हती.
अखेर मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपनीने निविदा प्रक्रियेद्वारे एका खासगी कंपनीला विराटचं भंगार देण्याचा निर्णय घेतला. भंगारात जाण्यासाठी विराटचा अखेरचा जलप्रवास सुरू झालाय.
या युद्धनौकेचे युद्ध संग्रहालयात रूपांतर करण्याबाबत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र सरकारने उत्सुकता दाखवली होती. मात्र यासाठी कोणीही ठोस पुढाकार घेतला नाही. तसंच केंद्र सरकार असो, नौदल... विराटचे युद्धसंग्रहालयात रूपांतर करण्याबाबत फारसे उत्सुक नव्हते. त्यातच नौदलाच्या तळावर जागा मर्यादित असतांना विराटमुळे भलीमोठी जागा नाहक अडवली जात होती. या सर्व कारणामुळेच अखेर विराट भंगारात काढण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला.