मुंबई : आयपीएल बेटींग प्रकरणी अभिनेता सलमान खानचा भाऊ, अभिनेता - दिग्दर्शक अरबाज खान आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याप्रकरणी त्याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने समन्स बजावले आहे. आयपीएल बेटींग प्रकरणातील सट्टेबाजांना नुकतंच ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी आरोपींनी अरबाज खानचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अरबाज खान समोरच्या अडचणी वाढल्या आहेत.
सट्टेबाज सोनू जालान याची कसून चौकशी केल्यानंतर अरबाजचं नाव समोर आलंय. समन्स जारी केल्यानंतर अरबाजला आता लवकरच पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय अरबाज खानला ठाणे पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अरबाजच्या बांद्रा स्थि घरी समन्स धाडले. पोलिसांनी सट्टेबाजांचं एक रॅकेटचं उघड केलंय. या प्रकरणात ४२ वर्षांच्या बुकी सोनू जालान याला अटक करण्यात आली होती.
सोनू जालान याच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या गोटाळ्यात मोठा डाव लावणाऱ्यांपैंकी एक अरबाज खान आहे. सोनू जालान हा कल्याण कोर्टात एका आरोपीला भेटण्यासाठी आला असताना त्याला पोलिसांनी अटक केली होती. सोनू जालान उर्फ सोनू मलाड याला ठाणे एन्टी एक्स्टॉर्शन सेलनं अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज खान आणि सोनू जालान हे दोघे चांगले मित्रही होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू जालान हा डी कंपनीसाठी काम करत होता आणि त्यानं दोन क्रिकेट मॅचही फिक्स केल्या होत्या.