आशियातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची जुळी मुलं ईशा आणि आकाश 32 व्या वाढदिवस साजरा करत आहेत. अगदी लहान ईशा आणि आकाशने रिलायन्सचे चित्र बदलंय. दुसरीकडे मुलांच्या वाढदिवसापूर्वीच मुकेश अंबानी यांना जोरदार झटका बसला असून त्यांचे ₹34,473.43 कोटींचे नुकसान होईल. झालं असं की, मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाची किंमत 1.86% (₹50.95) ने घसरुन ते ₹2687.30 वर बंद झालं. या घसरणीमुळे मुकेश अंबानी यांना ₹34,473.43 कोटींचा तोटा झालाय. ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप आदल्या दिवशीच्या ₹18,52,735.51 कोटींवरून ₹18,18,262.08 कोटी खाली गेलंय.
मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षीच्या एजीएममध्ये तरुण पिढीकडे व्यवसायाची कमान सोपवली आहे. ईशा आणि आकाश अंबानी या तरुण पिढीकडे जबाबदारी सोपल्यानंतर ते दोघे काय काय काम पाहतात आणि त्यांची संपत्ती किती आहे, ते पाहूयात.
रिलायन्सचा संपूर्ण रिटेल व्यवसाय ईशा अंबानीकडे आहे. ती $111 अब्ज मार्केट कॅपसह रिलायन्स रिटेलचे प्रमुख आहे. त्यांच्या हाताखाली 100 हून अधिक कंपन्या आहेत. त्यात अनेक विदेशी कंपन्या आणि भारतीय ब्रँड आहेत. याशिवाय, ईशा ऑनलाइन फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रँड अजिओची व्यवस्थापकीय संचालक देखील आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डावर देखील आहे. एवढेच नाही तर ईशा रिलायन्स जिओ इन्फोकॉमची कार्यकारी समिती सदस्य देखील आहे. ईशा रिलायन्सची वित्तीय कंपनी Jio Financial Services Limited (JFSL) ची संचालक आहे. ईशा रिलायन्स फाऊंडेशनसोबत काम करते आणि फाऊंडेशनच्या मुलांसाठी आणि महिलांसाठीच्या कामाशी संबंधित आहे.
रिलायन्स रिटेल हे मार्केट कॅपच्या बाबतीत टॉप 10 जागतिक रिटेल विक्रेत्यांपैकी एक आहे आणि कमाईच्या बाबतीत टॉप 30 मध्ये आहे. 2024 मध्ये रिलायन्स रिटेलचा एकूण महसूल 3.06 लाख कोटी (US$ 36.8 अब्ज) होता. त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत, रिलायन्स रिटेलचा वार्षिक निव्वळ नफा 10,000 कोटींच्या पुढे आहे.
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी ब्लॉकचेन, 5जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांसारख्या तंत्रज्ञानाच्या प्रचाराचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतो. आकाशला गेल्या वर्षी रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं. जिओ प्लॅटफॉर्मच्या बोर्ड सदस्यांमध्ये आकाशचाही समावेश आहे. आकाशाचा हातात जिओची जबाबदारी आल्यानंतर 2016 मध्ये लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांत 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा आकडा पार केला होता.
आज देशभरात जिओचे 45 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. याशिवाय आकाश आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापनही पाहतो. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. ईशाप्रमाणेच आकाशचाही टाईम मॅगझिनच्या टाईम 100 नेक्स्ट लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. फॉर्च्युन 40 अंडर 40 बिझनेस लीडर्समध्येही त्याचे नाव समाविष्ट आहे.
रिलायन्स जिओने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. Jio Platforms ने सप्टेंबर तिमाहीत करानंतरचा निव्वळ नफा 23 टक्क्यांनी वाढवून 6,539 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर महसूल वार्षिक 18 टक्क्यांनी वाढून 37,119 कोटी रुपये झाला आहे.
ईशा आणि आकाश यांचीही नावे हुरुनच्या श्रीमंतांच्या यादीत आलं असून ईशा अंबानीकडे 800 कोटींची संपत्ती तर आकाश अंबानीकडे 3300 कोटींहून अधिक संपत्ती नावावर आहे.