Jayant Patil On Sharad Pawar : येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावण्याचा मेगा प्लॅन भाजप आखत आहे. भाजपने 'मिशन बारामती' हाती घेतलं आहे. बारामतीचा पुढचा खासदार सेना-भाजपचा असणार आहे. नकली शिवसेनेचा नाहीतर असली शिवसेनेचा असणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
बारामतीमधील जनता कशी आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे बारामतीमध्ये कोणी आलं तरी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळतंच. बारामतीमधील एकवेळ सुर्य पश्चिमेकडे उगवेल पण बारामतीकर पवारांना सोडणार नाहीत एवढं ते नात घट्ट असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
आम्ही सर्वात मोठ्या लोकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे हा दाखवण्याची भाजपची पद्धत आहे. आम्हीही काही दिवसात आमची योजना मांडू, त्यावेळी कुणाकुणाला लक्ष्य करतोय हे तुमच्या लक्षात येईल. सत्तेत असताना लोकांची कामं करायची सोडून अशा तयारीला लागले आहेत. जेव्हा भाजपची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशी गोष्ट भाजप करत असल्याचं म्हणत पाटील यांना भाजपला टोला लगावला.
दरम्यान, भाजपने बावनकुळे यांचं विधानसभेचं तिकीट का नाकारलं होतं. यावर ते चर्चा करू इच्छित नाहीत. मात्र बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याबाबत अशा पद्धतीनं बोलणं त्यांना शोभत नाहीत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.