‘’‘मोदी गो बॅक’ घोषणा देणाऱ्याला भाजपचं तिकीट’’

कधी कधी वाटतं पक्ष सोडून जावं - एकनाथ खडसेंची खदखद

Updated: May 8, 2020, 06:49 PM IST
‘’‘मोदी गो बॅक’ घोषणा देणाऱ्याला भाजपचं तिकीट’’ title=

दीपक भातुसे, मुंबई :  निष्ठावंतांना डावलून पक्षाबाहेरून आलेल्या आणि ‘मोदी गो बॅक’चा नारा देणाऱ्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली, त्यामुळे मी नाराज आहे, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली. कधी कधी मला पक्ष सोडून जावं असं वाटतं, अशी भावनाही त्यांनी ‘झी २४ तास’शी फोनवरून बोलताना व्यक्त केली.

पक्षाने पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी अशी तिघांची शिफारस केली होती असं सांगण्यात आलं होतं. मीही विनंती केली होती की मला संधी द्यावी. आमची अपेक्षा होती की ज्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे. मी ४०-४२ वर्षे काढली. पंकजाचं घराणंच भाजपमध्ये आहे. बावनकुळे आहेत. पण ज्या गोपीनाथ पडळकरांनी ‘मोदी गो बॅक’ची घोषणा दिली होती, जे मोहिते-पाटील आयुष्यभर राष्ट्रवादीची सेवा करून आता भाजपच्या सेवेत आलेत, त्यांना उमेदवारी दिली गेली, हे योग्य नाही. बाहेरून लोक येतात त्यांना संधी मिळते आणि वर्षानुवर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांना डावलले जाते याचे दुःख आहे, असे खडसे यांनी सांगितलं.

होय, मला अन्य पक्षांकडून ऑफर होती

कधी कधी संताप झाला की वाटतं पक्ष सोडून जावं. पण अशी एक व्यक्ती आहे जी मला आवरते. कधीकधी वाटतं राष्ट्रवादीत जावं, शिवसेनेत जावं. पण इतके दिवस मी आवरलेलं आहे आणि पक्षात राहिलो आहे, अशा शब्दांत खडसे यांनी त्यांच्या मनातली घुसमट व्यक्त केली.

मला राष्ट्रवादीची ऑफर होती, मला काँग्रेसची ऑफर होती, मला शिवसेनेचीही ऑफर होती. मी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो होतो. पण तरीही मी ठरवलं की मी पक्षाबरोबर राहीन, असंही खडसे पुढे म्हणाले.

मला टार्गेट केलं गेलं

पक्ष म्हटलं की आपले लोक असतात तसे विरोधकही असतात. पक्षात हे घडत असतं. मला ट्रोल केलं गेलं. एखाद्याला टार्गेट करून बदनाम कसे केले जाते याचं उदाहरण म्हणजे एकनाथ खडसे. दोषी ठरवण्यासाठी प्रयत्न करणं, चारित्र्यावर शिंतोडे उडवणं याचा अनुभव मी घेतला आहे. राज्यसभेच्या वेळी माझं एकमुखाने एकच नाव दिलं होतं. पण राज्यसभेवर दुसरं नाव आलं. पक्षाशी बांधिल राहिलो तरी हे घडलं याचं दुःख आहे. हा पक्ष उभा करण्यात आमचं काहीतरी योगदान आहे. पक्ष उभारणीत असंख्य हातभार लागलेले आहेत. अशांमधल्या कार्यकर्त्यांना परिषद मिळाली तर आनंद असतो. पण पक्ष आहे. शेवटी, पक्षाचा निर्णय आहे, वरिष्ठांनी घेतलेला आहे, असं खडसे म्हणाले.

माझ्या विरोधकांची नावे महाराष्ट्राला तोंडपाठ आहेत

एवढे आघात झाले मी एकटा लढत गेलो. पक्षातल्या काही लोकांनी मला नेहमीच सहकार्य केलं, माझ्या पाठिशी उभे राहिले. काही वरिष्ठही पाठिशी उभे राहिले. बंड करणारा माणूस नाही मी. अनेकदा अन्याय झाला तेव्हा करता आलं असतं. 1980 ला पक्ष स्थापन झाला तेव्हापासून काम करतो आहे. दगडधोंडे खाल्लेत. अशा वेळी आता काही करावं योग्य वाटत नाही. मला कोणी टार्गेट केलं त्यांचं नाव उघड करायची गरज नाही. योग्य नेत्यांकडे मी सांगितलं आहे. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे नाथाभाऊला कोण छळत होतं. लोकांना नावं पाठ झालीत, असे खडसे म्हणाले.

 

सगळ्यांना क्लीन चिट मिळाली, पण मला मिळाली नाही

माझ्यावर आरोप झाले, चौकशी झाली, पण क्लीन चिट मिळाली नाही. माझ्याव्यतिरिक्त अनेकांवर आरोप झाले, सर्वांना क्लीन चिट देत गेले. माझी बाजू योग्य असतानाही मला फक्त त्यांनी क्लीनचिट दिली नाही. पण जे घडलं ते घडून गेलं, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही रोष व्यक्त केला.