बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत - सुप्रिया सुळे

'कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरे यांची ईडी चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र'

Updated: Aug 22, 2019, 12:56 PM IST
बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत - सुप्रिया सुळे  title=

मुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरे यांची ईडी चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलीय. तसंच ईडी चौकशीसाठी कुटुंबासहीत जाणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर कुणीही टीका करण्याची गरज नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. 'अशा कठिण प्रसंगी कुणाच्याही मागे त्यांचे कुटुंबीय उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुणी गेलं तर त्यावर टीका करू नये' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटंलय.  

कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ईडी कार्यालयात चौकशी सुरु झालीय. राज ठाकरेंना ईडीकडून आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार राज ठाकरे आज सकाळी १०.३० वाजल्याच्या सुमारास आपल्या 'कृष्णकुंज' निवासस्थानातून निघाले. जवळपास अर्धा ते पाऊणतासात ते ईडीच्या कार्यालयात पोहचले. यादरम्यान राज यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित, मुलगी शर्मिला आणि सून मिताली असा सगळा परिवार उपस्थित आहे. राज ठाकरे यांना एकट्याला ईडी ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर ईडीच्या कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'राज ठाकरेंच्या चौकशीतून काहीही निष्पण्ण होईल असं वाटत नाही' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याबद्दलच बोलताना 'बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली' असंही सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या पारड्यात आपली सहानुभूती टाकलीय. 

 

 तर दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हीडीओ' या टीकेमुळेच सरकारने राज ठाकरेंना ईडीची नोटीस पाठवल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलीय. सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप मुंडेंनी केलाय.