लेबरच्या मुलाची राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

असद शाहने गेल्या तीन राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून सातत्यपूर्ण कामगिरी केलीये आणि त्यापैकी दोन स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा मानही पटकावला आहे.

Updated: Jun 5, 2022, 01:15 PM IST
लेबरच्या मुलाची राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी title=

मेघा कुचिक, मुंबई : मुंबईतील मालवणी झोपडपट्टीतील सेंट मॅथ्यू हायस्कूल म्हणजे प्रतिभावान बॉक्सर्सची खाण आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवत असतात. याच शाळेतील असद शाह बॉक्सरने राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. आता 14 वर्षीय सब-ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियन असद शाहची JSW द्वारे इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (IIS) मध्ये निवड झालीये. 

असद शाहने गेल्या तीन राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून सातत्यपूर्ण कामगिरी केलीये आणि त्यापैकी दोन स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा मानही पटकावला आहे. मे 2022 मध्ये असदला इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (JSW) कर्नाटकमध्ये आयोजित सब-ज्युनियर नॅशनल इव्हेंटमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. त्याच्या या गुणवत्तेची दखल इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सने (IIS) घेतली आणि आता त्याची निवड देशातील या सर्वोत्तम क्रीडा संस्थांपैकी एक असलेल्या संस्थेत झाली. 

लेबरचा मुलगा बॉक्सर असद शाह महाराष्ट्राची शान!

असद शाह हा अतिशय गरीब कुटुंबातील आहे. मुंबईतील मालवणीच्या झोपडपट्टीत तो राहत असून त्याचे वडील मुमशाद अली हे लेबर म्हणून काम करतात. त्याची आई घरीच असून त्याला दोन बहिणी आहेत. त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. मात्र सेंट मॅथ्यू शाळेने त्याला योग्य अशी दिशा दिली. शाळेत बॉक्सिंग खेळण्यासाठी पोषक वातावरण असल्याने त्याने बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली आणि आज तो राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता बॉक्सर आहे. 

दरम्यान त्याने मुंबई बॉक्सिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि त्याच्यातील बॉक्सरला पैलू पडू लागले. असद MSSA 3 वेळचा सुवर्णपदक विजेता (2017-18-19) ठरला आहे. तर महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपमध्ये 3 वेळा सुवर्णपदक आणि 2 वेळा सर्वोत्कृष्ट बॉक्सर पुरस्काराचा मानकरी तो ठरला आहे. 

याशिवाय पश्चिम विभागीय राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत असदने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

मुख्याध्यापिका लार्झी वर्गीस यांचा सिंहाचा वाटा

सेंट मथ्यूज शाळेच्या मुख्याध्यापिका लार्झी वर्गीस यांचा असदच्या या यशात मोलाचा वाटा आहे. मालवणीच्या या शाळेत 100 हून अधिक मुलं बॉक्सिंग खेळतात. तर मुंबई बॉक्सिंग अकादमीचे संस्थापक शैलेश त्रिपाठी आणि त्यांचे प्रशिक्षक अजय मेनन आणि भीष्म मल्ला हे या सर्व बॉक्सर्सना प्रशिक्षण देत असतात. या बॉक्सर्सची प्रगती पाहता असद शाननंतर इतरही अनेक बॉक्सर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडण्यास आतूर आहे.