मुंबई: मुंबईतून पदवीधर निवडणुकिसाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. २५ जूनला ही निवडणूक होत असून, अर्ज मागे घेण्याची आज (सोमवार, ११ जून) अखेरची मुदत आहे. या निवडणुकीसाठी जवळपास ६५ हजार इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई पदवीधरसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून उत्तर मुंबईचे विभागप्रमुख विलास पोतनिस मैदानात आहेत. तर भाजपकडून मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि पक्षाच्या ग्राहक हक्क संरक्षण सेलचे प्रमुख अॅड. अमित मेहता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धारावी बचाव समितीचे प्रमुख अॅड. राजेंद्र कोरडे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्या पुरोगामी पदवीधर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत असून मुंबई ग्रॅज्युएट महासंघाचे अध्यक्ष राजू बंडगर यांना पक्षाने पाठिंबा दिलाय.
मुख्यत्वे लढत ही चौरंगी होईल असं मानलं जातेय. त्यात थेट शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई पुन्हा अपेक्षित आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- शेकाप पुरस्कृत पुरोगामी पदवीधर आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुरस्कृत उमेदवारही आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत..