महिनाअखेरीस सर्वांसाठी लोकल सुरु होण्याची शक्यता

 सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी 

Updated: Jan 13, 2021, 12:22 PM IST
महिनाअखेरीस सर्वांसाठी लोकल सुरु होण्याची शक्यता title=

मुंबई : सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यसरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. दरम्यान सर्वसामान्यांसाठी लगेचच रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत सरकारची सावध भूमिका कायम आहे.  राज्य सरकारच्या भूमिके बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. 

राज्यात आणि मुंबईत करोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. मात्र सामान्यांसाठी लगेचच रेल्वे सेवा सुरू करणे धोक्याचे ठरेल, असाच सरकारमध्ये मतप्रवाह आहे. रेल्वे सेवा सुरू करण्याची घाई केल्यास त्याचे दुष्पपरिणाम होऊ शकतात. यामुळेच रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय महिनाअखेर घेतला जाईल अशी शक्यता आहे.

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत आज निर्णय येऊ शकतो. मुंबई हायकोर्टातील याचिकेवर राज्यसरकार आज स्पष्टीकरण देणार आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार सावध पवित्रा घेत आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. लोकल सुरु केल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. यातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला ३ कोटी लोकांना ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरणानंतर लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.