Lockdown 2.0 | राज्यात 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन?

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पहाता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Updated: Apr 13, 2021, 03:55 PM IST
Lockdown 2.0 | राज्यात 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन?

मुंबई : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पहाता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. प्रत्येक घटकाचा त्रास कसा कमी होईल, याचा विचार करुन लॉकडाऊन आखण्यात येत आहे. कारण लॉकडाऊन एवढीच महत्त्वाची जबाबदारी राज्यावर कोरोना आटोक्यात आणण्याची आहे. 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 दिवस लॉकडाऊन करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार सुरु आहे. अजून यावरती मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलेलं नाही. सध्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याचा निर्णय करुन लॉकडाऊन बाबतच्या मार्गदर्शक सूचना आजच जारी करण्यात येतील, अशी झी २४ तासच्या सुत्रांची माहिती आहे.

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. तसेच थोडी आर्थिक मदत देण्याचा ही सरकारचा विचार करत आहे. संपुर्ण लॅाकडाऊन असला तरीही सार्वजनिक वाहतुक सुरु ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु यामध्ये देखील काही नियम आणि अटी लागू होणार आहेत. यामध्ये सरसकट कोणीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरु शकणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे लोकंच त्याचा वापर करू शकतील.

लॉकडाऊनचा फटका हा सर्वस्तरांवर बसतो, पण सर्वच घटकांना कमीत कमी त्रास होईल, याकडे लक्ष देऊन लॉकडाऊनची प्रत्येक बाब विचारात घेऊन अंमलबजावणीसाठी पुढे करण्यात येणार आहे, अर्थातच राज्यातील नागरिकांचं आरोग्य सांभाळण्यासाठी हे पाऊल टाकणे सरकारला अनिवार्य आहे. मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे.