लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते. 

राजीव कासले | Updated: May 28, 2024, 03:20 PM IST
लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप title=

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते. आता विधानसभेसाठीही हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतरच महायुतीची विधानसभेची (Vidhansabha) रणनीती ठरणार आहे. लोकसभेचा स्ट्राईक रेटच (Loksabha Strike Rate) महायुतीचं (Mahayuti) विधानसभा जागावाटप ठरवणार असल्याची माहिती मिळतेय. 

पक्षाच्या स्ट्राईक रेटवर जागावाटप
ज्या पक्षाचा लोकसभेत स्ट्राइक रेट चांगला त्या पक्षालाच विधानसभेत जास्तीच्या जागा मिळणार, त्यामुळे कुणाला किती जागा सोडायच्या हे राज्यातील लोकसभा निकालावर ठरणार आहे. जिंकून येणे हे एकमेव धोरण डोळ्यासमोर असल्यानेच विधानसभेसाठी लोकसभा निवडणुकीचा स्ट्राईक रेट महायुतीत महत्त्वाचा असणार आहे अशी माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिलीय.. 

भुजबळांची तलवार म्यान
विधानसभा जागावाटपाबाबत (Vidhansabha Seat Sharing) आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळांनी आपली तलवार म्यान केलीय. भाजप मोठा भाऊ आहे, त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळणारच अशी भूमिका भुजबळांनी आता घेतलीय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळांनी विधानसभा जागावाटपात 80-90 जागा मिळाव्यात असा आग्रह धरला होता. महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा होऊ नये यासाठी 80-90 जागा देण्याच्या शब्दाची भाजपला आतापासूनच आठवण करुन द्यावी, अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली होती. त्यावर भाजप मोठा भाऊ असल्याचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.  आता भुजबळांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय.. 

भाजपात संघटनात्मक फेरबदल
लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप राज्यात मोठे संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभेसाठी विस्तारकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र ज्या पद्धतीनं लोकसभेत काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं काम झाले नाही अशा पद्धतीचा अहवाल समोर आलाय. दोन दिवस विस्तारकांची भाईंदर इथं बैठक पार पडली. त्याठिकाणी हा अहवाल सादर करण्यात आला. त्यामुळे लवकरच ज्यांनी काम केलं नाही त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणारेय. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष, मंडळ प्रमुख, पन्ना प्रमुख यांचा देखील रिपोर्ट तयार करण्यात येणारेय.

उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान
अमित शाहांनी उद्धव ठाकरेंसंबंधी मोठं विधान केलंय. 2019 मध्ये भाजप-शिवसेना एकत्र लढले होते. शरद पवारांनी आमच्या मित्राला दूर नेलं.. ज्यांनी हे सुरु केलं.. त्यांनाच संपवावं लागेल.. असं विधान अमित शाहांनी केलंय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाहांनी हे विधान केलंय. उद्धव ठाकरेंना परत सोबत घेणार का या प्रश्नावर..  शिंदें गटासोबत आमची युती आहे आणि सर्व काही व्यवस्थित सुरु आहे अशी प्रतिक्रिया अमित शाहांनी दिलीय.