'असली- नकली शिवसेना अमित शाह ठरवू शकत नाहीत; हातात पैसा आला म्हणून...' संजय राऊतांचे शाब्दिक वार

Loksabha Election 2024 Sanjay Raut : संजय मंडलिक यांच्यावर घणाघात... छत्रपतींच्या वारसदाराविषयी काय म्हणाले संजय राऊत? पाहा सविस्तर वृत्त   

सायली पाटील | Updated: Apr 12, 2024, 10:40 AM IST
'असली- नकली शिवसेना अमित शाह ठरवू शकत नाहीत; हातात पैसा आला म्हणून...' संजय राऊतांचे शाब्दिक वार  title=
Loksabha election 2024 Sanjay raut slams amit shah and sanjay mandlik over their statments latets update

Loksabha Election 2024 Sanjay Raut : महाराष्ट्रात सध्या अनेक नेतेमंडींच्या आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलं असून, हे वादळ काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीय. नुकतंच कोल्हापुरातील भाजप नेते संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयी केलेल्या 
आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही मंडलिक यांचे कान टोचले. 

शाहू महाराज छत्रपतींचे वारसदार नाहीत मग मंडलिक वारसदार आहेत का? असा सवाल त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला. संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर यावेळी संजय राऊत यांनी जळजळीत शब्दांत टीका केली. 'मंडलिंकांचे वडीलही शाहू महाराजांच्या जवळचे होते. किंबहुना सदाशिवराव मंडलिक यांनी शाहू महाराजांच्या जवळ राहूनच कोल्हापुरातील अनेक कामं केली. प्रत्यक्षात कोल्हापुकरातील गादीविषयी महाराष्ट्राला आदर आणि श्रद्धा आहे आणि आता या निवडणुकीत जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय हे जसं लक्षात येऊ लागलंय तेव्हा लगेचच त्यांनी महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे, हे लक्षण चांगलं नाही', असं म्हणत मंडलिकांनी राजकीय स्वार्थासाठी आक्षेपार्ह भाषा न वापरण्याचा इशारा राऊतांनी दिला. 

धमकीसत्र थांबवा, महाराष्ट्र हे सहन करणार नाही 

(Kolhapur) कोल्हापूर, हातकणंगले आणि इतर ठिकाणी भाजपसह मिंधे गटानं जे धमकी सत्र सुरु केलं आहे, जी आमिषं दाखवली जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या किंबहुना केंद्राच्या निवडणूक आयोगानं घेतली पाहिजे असा सूर राऊतांनी आळवत ही धमकीसत्र थांबवण्याचं खुलं आव्हान सत्ताधाऱ्यांना केलं. 

शाह यांच्या वक्तव्यावर... 

अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेनेसंदर्भात केलेलं वक्तव्य याआधी पंतप्रधान मोदी यांनी ही बाब पुन्हा प्रकाशात आणत असली आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाहीत, असं राऊतांनी ठणकावून सांगितलं. 'तुमच्या हातात पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना हाताशी धरून तुम्ही एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असाल, तर जनता ते सहन करणार नाही', हे त्यांनी स्पष्ट केलं. 

हेसुद्धा वाचा : अतिसार- उलट्या आणि पोटदुखी... मुंबईत उकाड्यामुळं लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं

'तुमच्या मतानुसार नकली शिवसेनेच्या (Shivsena) प्रमुखांना म्हणजेच उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी, त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण अनेकदा मातोश्रीवर आलात. तेच उद्धव ठाकरे, तीच शिवसेना, तीच मातोश्री... आपण स्वत:, आम्हाला पाठींबा द्या हे सांगण्यासाठी 2019 च्या निवडणुकीत तिथं आला होतात तेव्हा हीच शिवसेना खरी होती', असं म्हणजताना तुम्हाला साथ देणाऱ्या खोट्या मंडळींमुळं आता तुमचा  कपाळमोक्ष अटळ असल्याचं सूचक वक्तव्य करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. 

महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हेच दोन खरे पक्ष आहेत असं म्हणत ड्युप्लिकेट पक्षाची स्थापना करणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ  शिंदे यांचा निकाल या निवडणुकीत जनता लावेलच हा इशाराही त्यांनी दिला.