अर्थमंत्र्यांनी निधी न दिल्याने अंगणवाडीतील पोषण आहारावर परिणाम

पोषण आहारावर परिणाम झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेतच मान्य केलं. 

Updated: Mar 7, 2018, 01:43 PM IST
अर्थमंत्र्यांनी निधी न दिल्याने अंगणवाडीतील पोषण आहारावर परिणाम title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अर्थमंत्र्यांनी पुरवणी मागण्यात पैसे न दिल्याने राज्यातील अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारावर परिणाम झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेतच मान्य केलं. 

किती मागितला होता निधी?

विधिमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील पोषण आहारासाठी पुरवणी मागण्यात ५२२ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र पुरवणी मागण्यात या रकमेची तरतुद करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द या खात्याच्या मंत्र्यांनी विधानसभेत दिली. 

सेविका पदरचे पैसे टाकून आहार देताहेत

डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनातील पुरवणी मागण्यात मंजूर झालेला निधी वितरित केला जाईल, मात्र उरलेला निधी मिळाल्याशिवाय तो वितरित करता येणार नाही अशी हतबलता पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दाखवली. याप्रकरणी विरोधकांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधलं. अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका पदरचे पैसे टाकून किंवा उधारीने धान्य आणून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देत आहेत. राज्यभरात अंगणवाड्यांमध्ये ७३ लाख बालक आहेत.

विरोधकांचा सभात्याग

एवढ्या गंभीर बाबीकडे मंत्र्यांचे आणि सरकारचे लक्ष नसल्याने विरोधकांनी याप्रकरणी विधानसभेतून सभात्याग गेला. हा थेट बालकांच्या पोषणाशी संबंधित आणि गंभीर विषय असल्याने याबाबत तातडीने बैठक घेऊन निधी देण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही विधानसभेत केली.