Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपच्या (BJP) वाटेवर जाणार असल्याच्या चर्चांना अखेर अजित पवार यांनीच पूर्णविराम लावला आहे. कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्याचं काम सुरु असल्याचं सांगत अजित पवार यांनी भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वेगवेगळ्या चॅनेलवर इतर राजकीय पक्षांचे नेते त्यांची मतं व्यक्त करत आहेत, तो त्यांचा आधिकार आहे' असं अजित पवार म्हणाले आहेत.
इतर पक्षांच्या प्रवक्त्यांना सुनावलं
आमच्या पक्षात कोणतीही अशी चर्चा नाही. काही विघ्नसंतोषी लोकं आमच्याविरोधात बातम्या पेरण्याचं काम करतायत, आमच्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कोणी नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. याबरोबरच अजित पवार यांनी इतर पक्षातील प्रवक्तांनाही सुनावलं आहे. काही इतर पक्षांचे प्रवक्ते, आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत, त्यांना कोणी अधिकारी दिला आहे कोणास ठाऊक, तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाबद्दल बोला, तुमच्या पक्षाच्या मुखपत्राबद्दल बोला पण तुम्ही आम्हाला कोट करुन असं झालं, तसं झालं असं म्हणत अजित पवार यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.
आम्ही आमची भूमिका मांडण्यास खंबीर आहोत. आमचं वकिलपत्र दुसऱ्यांनी घेण्याचं कारण नाही, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी असं सांगत अजित पवार यांनी आमच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आमचा प्रवक्ता, आमच्या पक्षाचे नेते मजबूत आहेत असं सुनावलं आहे. मविआच्या बैठकीत आपण याबाबत बोलणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
'चर्चा थांबवा, तुकडा पाडा'
जोपर्यंत जिवात जीव आहोत, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार असल्याचं सांगत या चर्चा थांबवा, तुकडा पाडा अशी विनंती अजित पवार यांनी पत्रकारांना केली. 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त निराधार असल्याचं सांगत अजित पवार यांनी आम्ही राष्ट्रवादीतच राहाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे काही आमदार मला भेटले अशा बातम्या चालवल्या जात आहेत, पण प्रत्येक मंगळवारी आमदार मला भेटतात, त्याचा वेगळा अर्थ काढू नका आमदारांबाबत चुकीच्या बातम्या देऊ नका त्यातून संभ्रम निर्माण होत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
राज्यात सध्या अनेक प्रश्न आहेत, त्यावर लक्ष विचलित करण्यासाटी हा प्रकार सुरु असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील दुर्घटना ही सरकारनिर्मित आपत्ती असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. माणसाच्या जीवाशी सरकार का खेळलं याचं उत्तर द्यावं अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. राजभवनातल्या हॉलमध्ये पुरस्कार सोहळा घेता आला असता मात्र निष्काळजीपाण नडला असंही अजित पवार यांनी म्हटलंय.