अवेळी पावसामुळे निवडणूक आयोगाची तारांबळ

पाहा अनेक मतदान केंद्रांवर चिखलाचं साम्राज्य

Updated: Oct 20, 2019, 07:13 PM IST
अवेळी पावसामुळे निवडणूक आयोगाची तारांबळ  title=

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीवर पावसाचं सावट आहे. एकट्या मुंबई- उपनगरात दोन हजारांहून अधिक मतदान केंद्र ही तंबूत उभारण्यात आली आहेत. यापुढे आवाहन आहे ते साचलेल्या चिखलाचं. अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळं तंबूतील याच मतदान केंद्रांभोवती आता चिखल झाला आहे. तर, राज्यात निवडणूक यंत्रणेसमोरही पावसानं आव्हान निर्माण केलं आहे.

पाऊस किती लहरी आहे याचा आता पुरेपूर अनुभव निवडणूक आयोगाला आला असावा. विधानसभा निवडणुकीचं नियोजन करताना निवडणूक आयोगानं पावसाला गृहितच धरलं नव्हतं. पण पावसानं अचानक एंट्री करुन निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडवली. याचा फटका मुंबईतील बऱ्याच मतदान केंद्रांना बसला. मुंबई आणि उपनगरात जवळपास २ हजारांच्या वर मतदानकेंद्र तंबूत आहेत. या तंबूंवर ताडपत्री टाकली असली तरी तंबूंच्या आसपास पावसामुळे चिखल झाला आहे.

हा सर्व चिखल पाहता या केंद्रापर्यंत पोहोचायचं कसं, असा प्रश्नच मतदारांना पडला आहे. शिवाय तिथे पोहोचण्यासाठी वयोवृद्धांनाही काही अडचणींचा सामना करावा लागणार आहेच, याविषयी निवडणूक आयोगाने विचार केला पाहिजे, असा सुर मतदारांनी आळवला आहे.

दरम्यान, तंबूत मतदान केंद्र ठेवताना निवडणूक आयोगानं आगप्रतिबंधक यंत्रणा उभारली होती. पण पावसामुळे अशी तारांबळ उडेल याची निवडणूक आयोगाला कल्पनाही नव्हती. ज्यामुळे आता या अडचणींनी डोकं वर काढल्याची माहिची आयोगाकडून मिळत आहे. 

फक्त मुंबईच नव्हे, तर तिथे पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये मतदान पथकांना घेऊन जाणाऱ्या बसेस पावसामुळे चिखलात अडकल्या. चिखलात रुतलेला बसेस काढण्यासाठी ट्रॅक्टरही मागवावे लागले. ईव्हीएम मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पाऊस आणि चिखलातून वाट काढावी लागली. हे सर्व चित्र पाहता एकप्रकारे पावसानं निवडणूक आयोगाची परीक्षाच पाहायला घेतली असं म्हणायला हरकत नाही.