मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आजच निवृत्त होणार?

मुदतवाढीच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिलेली नसल्याने राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता

Updated: Nov 30, 2021, 07:01 PM IST
मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आजच निवृत्त होणार?

दीपक भातूसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ आज म्हणजे 30 नोव्हेंबरला संपत आहे. सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. पण सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारने मंजूर केलेला नाही.

केंद्राकडून राज्य सरकारची कोंडी
केंद्राकडून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. आज रात्रीपर्यंत प्रस्ताव मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर झाली नाही तर सरकारला नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती करावी लागणार आहे. सीताराम कुंटे यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण केंद्र सरकारने अद्याप या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नसल्याने राज्याची कोंडी होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून मुदतवाढीचा प्रस्ताव
राज्याचे मुक्य सचिव सीताराम कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि ठाकरे सरकार(Uddhav Thackeray) बरोबर निर्माण झालेले चांगले संबंध यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे. राज्यात मुंबईसह इतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता सीताराम कुंटे यांच्याकडेच मुख्य सचिवपदाची धुरा असावी याकडे महाविकास आघाडीचा कल आहे. 

कोरोना काळाच चोख कामगिरी
सीताराम कुंटे हे 1985 च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहे. राज्यात कोरोना काळात सीताराम कुंटे यांनी चांगलं काम केलं. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. सीताराम कुंटे हे मार्च 2021 पासून मुख्य सचिव आहेत.