गोविंद तुपे, झी मीडिया मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadanvis Government) गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा (Anandach Shida) वाटप केला. यात 1 किलो पामतेल, 1 किलो रवा, 1 किलो साखर, आणि 1 किलो चनाडाळ अशा चार वस्तू आहेत. आता पुन्हा रेशनच्या (Ration) माध्यमातून या आनंदाचा शिधाचं वाटप सुरू आहे. या चार वस्तूंच्या शिधासाठी सरकार केंद्रीय भांडार या कंत्राटदारी संस्थेला 287 रुपये मोजत आहे. आता तुम्ही म्हणाल की 287 रुपयांचा शिधा सरकार 100 रुपयांना देतंय म्हणजे जनतेला मोठा दिलासा आहे. मात्र थांबा...जनतेला स्वस्तात शिधा देण्याच्या नावाखाली सरकार महागडा शिधा खरेदी करून ठेकेदारांचं (Contractor) उखळ पांढरं करतंय. या शिधामधून गरिबांना कमी आणि ठेकेदारांनाच जास्त आर्थिक आनंद मिळत असल्याचं झी 24 तासच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये (Investigation Report) उघड झालंय.
सत्यपरिस्थिती तपासण्यासाठी आम्ही चेंबूर परिसरातल्या पी. एल लोखंडे मार्गवरचं एक किराणा दुकानात गाठलं. पामतेल, रवा, साखर आणि चनाडाळ या चार वस्तूंची किरकोळ बाजारात २४० रूपये इतकी किंमत आहे. हा शिधा गरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी इतर खर्चांचाही तपशील आम्ही शोधून काढला.
कंत्राटदाराची घसघशीत कमाई
सरकार कंत्राटदाराला अनुशंगिक खर्च म्हणून प्रति क्विंटलला 270 रूपये मोजत असतं. म्हणजे एका कीटसाठी 10 रूपये 80 पैसे एवढा खर्च होतो. यात पॉस मशिन, हमाली, वाहतूक, जाहिरात, रेशन दुकानदार कमिशन, आणि इतर खर्चाचा समावेश आहे. म्हणजे एका कीटसाठी जास्तीत जास्त 251 रूपये खर्च होतो. त्यामुळे एका कीटमागे कंत्राटदाराच्या घशात तब्बल 36 रुपये जातात. ही तुलना झाली किरकोळ बाजारातल्या दरानुसार. मात्र सरकार तब्बल 1 कोटी 58 लाख 46 हजार 182 शिधा किटांचं वाटप करत आहे. किरकोळ बाजारभावानुसार कंत्राटदाराला तब्बल 57 कोटी रूपयांची घसघशीत कमाई होणार आहे.
होलसेल मार्केटमध्ये आणखी स्वस्त किट
होलसेल मार्केटमध्ये (Wholesale Market) हेच कीट 225 रुपयांना मिळतं. म्हणजे आणखी 15 रुपयांनी स्वस्त मिळतं. याचा अर्थ किटमागे 51 रुपयांचा मलिदा लाटला जातोय. 1 कोटी 58 लाख 46 हजार 182 शिधांच्या किटमागे ठेकेदारांचा नफा तब्बल 80 कोटी रुपयांवर जातो.
सरकारचं दिवाळं
यापूर्वी दिवाळीत वाटप केलेल्या शिधामधून ठेकेदारांनी तब्बल 45 कोटींची घसघशीत कमाई केली होती. गरिबांच्या नावाखाली वेगवेगळ्या नावानं संस्था थाटून तेच ठेकेदार सरकारचं दिवाळं काढून दिवाळी आणि गुढीपाडव्याचा आनंद लुटत असल्याचं झी 24 तास इन्व्हेस्टीगेशनमधून समोर आलंय. त्यामुळे इतर सरकारी योजनांप्रमाणेच आनंदाचा शिधाही ठेकेदार आणि बाबूंसाठी भ्रष्टाचाराचं कुरण ठरतंय की काय अशी शंका आता निर्माण झालीय.