मुंबई : आता बातमी सरकारच्या गतिमानतेच्या विक्रमाची. सरकारनं एकाच दिवसात तब्बल 192 अध्यादेश काढले आहेत. सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात 31 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने आपल्या कामातील गतिमानता दाखवली आहे. या एकाच दिवशी राज्य सरकारने तब्बल 192 शासन निर्णय, अर्थात जीआर काढले आहेत. यात सर्वाधिक शासन निर्णय सहकार आणि पणन विभागाकडून काढण्यात आले आहेत, त्यांची संख्या 26 इतकी आहे. तर उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाकडून एकूण 17 जीआर काढण्यात आले आहेत. कृषी, पशुसंवर्धन आणि मत्सव्यवसाय विभागाने 14 जीआर काढले आहेत.
शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थाना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठीचे सर्वाधिक जीआर आहेत. वर्षभर निधी खर्च करायचा नाही आणि आर्थिक वर्ष संपताना निधी वितरणाचे जीआर काढायचे ही मंत्रालयातील दरवर्षीची धावपळ यावर्षीही दिसून आली.
अर्थमंत्री सुधीर मुनगुटींवार यांनी प्रत्येक विभागाने फेब्रुवारीपर्यंत आपला निधी खर्च करण्याबाबत वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र तरीही आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निधी खर्च करण्याची प्रथा सर्व विभागांनी कायम राखल्याचं यावरून स्पष्ट होतं आहे.