दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान निर्मितीचे पंख डीजीसीएनेच छाटले आहेत. २०११ साली आपले सहा आसनी एक्सप्रिमेंटल विमान रजिस्टर करण्यासाठी अमोल यादव यांनी केलेल्या अर्जाला डीजीसीएने केराची टोपली दाखवलीय. मागील सात वर्ष विमानाच्या रजिस्ट्रेशनसाठी डीजीसीएचे उंबरठे झिजवणाऱ्या कॅप्टन अमोल यांनी आता आपले विमान अमेरिकेत रजिस्ट्रर करण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र त्यासाठी त्यांच्यासमोर उभी आहे ती आर्थिक अडचण...
मराठमोळ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या विमाननिर्मितीने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अमोल यांनी बनवलेले पहिले भारतीय बनावटीचे विमान जेव्हा २०१६ साली मेक इन इंडियामध्ये प्रदर्शित करण्यात आले तेव्हा त्यांचा परिचय सगळ्यांना झाला. त्यांच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. सामान्य माणसांपासून ते मुख्यमंत्र्यांसह राज्यातील आणि देशातील अनेक मंत्र्यांनी अमोल यांच्या या कामाबद्दल शाबासकीची थाप दिली. राज्य सरकारने तर त्यांना पालघर येथे १९ आसनी विमाननिर्मिती करण्यासाठी जागा देण्याचा निर्णयही घेतला. मात्र यासाठी अमोल यांचे विमान डिजीसीएने रजिस्ट्रर केलेले असावे अशी अट टाकली. मात्र डीजीसीएला कदाचित भारतात विमाननिर्मिती नको आहे अशी परिस्थिती आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी 2011 सालीच नियमानुसार डीजीसीएकडे आपले विमान रजिस्ट्रर करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना डीजीसीएकडून मागील सात वर्षात केवळ नकारच मिळाला आहे. अमोल यांचे विमान रजिस्ट्ररच होऊ नये म्हणून 25 जुलै 2014 रोजी डीजीसीएने त्यासंदर्भातील नियमच धक्कादायकरित्या वगळून टाकले.
कॅप्टन अमोल यांचे विमान रजिस्ट्रर करावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहलं होतं. याशिवाय स्वतः फडणवीस यांनी मोदींशी याबाबत चर्चाही केली होती. मात्र यानंतरही डीजीसीएच्या अधिकाऱ्यांचा नकारात्मकपणा कायम होता. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत पाठपुरावा झाल्यानंतर डीजीसीएने महिन्यांपूर्वी नवे नियम आणले. मात्र हे नियम आणताना अमोल यांचे विमान रजिस्ट्रर होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली.
सलग सात वर्ष डीजीसीएच्या दिल्ली कार्यालयात धडका दिल्यानंतर आता अमोल यादव पूर्णपणे निराश झाले आहेत. त्यामुळे आता त्यांनी आपले पहिले भारतीय बनावटीचे विमान अमेरिकेत रजिस्ट्रर करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेत विमान रजिस्ट्रर करण्याची प्रक्रिया सोपी आहे, मात्र आधीच विमाननिर्मितीसाठी भावाचे घर गहाण ठेवणाऱ्या अमोल यांच्यासमोर आता यासाठी लागणाऱ्या पैशांची अडचण आहे.
अमोल यांच्या विमान रजिस्ट्रेशनबाबत डीजीसीएची भूमिका जाणून घेण्यासाठी झी मिडियांना या विभागाचे अधिकारी एस. एस. भुल्लर आणि ललित गुप्ता फोनवर आणि एसएमएसद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.