Heavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. उद्या दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून उद्या म्हणजे 26 सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई सह ठाणे रायगड आणि पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे मध्य रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिट उशीराने धावत आहेत.
पुण्यात अनेक रस्ते जलमय
पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. पुण्यातील चारही प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालीये. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रामध्ये 2 हजार 568 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय.त्यामुळे नदीकाठच्या गावांनी खबरदारीच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्यात.
पीएम मोदींच्या सभेवर पावसाचं सावट
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात ते सभा घेणार आहेत, पण या सभेवर पावसाचं सावट आहे. मुसळधार पावसानं आज पुण्याला अक्षरश: झोडपून काढलंय. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं रुप आल्याचं पहायला मिळतंय. नवी पेठ रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी टाकलेली माती पावसामुळे वाहून गेलीये.
कल्याण-बदलापूरला पावसाने झोडपलं
कल्याणमध्येही मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशनवर आणि परिसरात पाणी साचलंय त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरूये..अर्धा तास वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे कल्याणमधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. तर बदलापुरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सानेवाडी, कात्रप, स्टेशन बाजारपेठ, मांजर्ली, रमेश वाडी, सानेवाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकाना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागतेय. अनेक दुचाकी, कार पाण्याखाली आल्यात.
लातूरमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला. शहरातील दत्त नगर भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून मोठे नुकसान झालं. घरातील संसारोपयोगी वस्तूंसह अन्नधान्य भिजल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आलीये. प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या नागिरकांनी केलीये. दरम्यान सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी घरांमध्ये चिखल आणि घाणीसंच साम्राज्य पसरलंय. त्यामुळे रोगराई पसरण्याचाही धोका निर्माण झालाय.
सांगलीतही तुफान पाऊस
सांगलीतल्या तासगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तालुक्यातील चिंचणी, लोढे, कौलगे, सावर्डे यासह परिसरामध्ये हा ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. सुमारे तीन तास पडलेल्या या अति मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला. यामुळे तासगाव लोढे आणि तासगाव सावर्डे रस्ता बंद झाला होता. तर अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटून गेल्याचे चित्र निर्माण झाले होतं.
वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं तर सायंकाळच्या दरम्यान रिसोड, मालेगाव व वाशिम तालुक्यात वादळी वारा विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल सोयाबीनपिकांसह खरिपाच्या तूर,कपाशी, ज्वारी, तीळ, नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांन मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे.