मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी गोविंदासाठी (Dahi Handi 2022) मोठी गुड न्यूज दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळणार असल्याचं जाहीर केलं. तसेच शासकीय नोकरीत (Government Job) स्थानही मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजादरम्यान त्यांनी ही मोठी घोषणा केली. (maharashtra monsoon assembly session day 2 cm eknath shinde important announcement to give dahi handi the status of a sport)
प्रो कब्बडीच्या धर्तीवर आता दरवर्षी राज्य सरकार प्रो दहीहंडी स्पर्धा भरवणार आहे. गोविंदांना यापुढं 5 टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, दहीहंडी उत्सवात दुर्दैवानं गोविंदांचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास साडे सात लाख रुपये, तर जखमी झाल्यास 5 लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
गोविंदा पथकातील खेळाडूचा थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाला आर्थिक मदत म्हणून 10 लाख रुपये देण्यात येतील. थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य केलं जाईल.
थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख आर्थिक सहाय्य केलं जाईल.
हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल.
या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पुढील अटी व शर्ती आहेत. दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणं आवश्यक आहे.
गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही. मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे. मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.