Monsoon Assembly Session : विधानसभेच्या उपसभापतीपदावर नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) कायम राहणार आहेत. कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवता येणार नसल्याचा निर्णय तालिका सभापती निरंजन डावखरे (Niranjan Dawkhare) यांनी दिलाय. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यानं त्यांना पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र 10 व्या शेड्युलनुसार उपसभापतींवर अशी कारवाई करता येणार नाही. तसंच अजूनही त्या शिवसेना (Shivsena) पक्षातच असल्याचं डावखरे यांनी म्हटलंय. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले म्हणून विरोधकांनी त्यांना पदावरून हटविण्याची तसंच त्यांना अपात्र करण्याची मागणी विधान परिषदेत केली होती
पण 10 व्या शेड्यूलनुसार उपसभापती यांच्यावर अशी कारवाई करता येणार नाही. तसंच त्या निवडून आलेला पक्ष शिवसेना असून त्या अजूनही शिवसेना पक्षातच असल्याचे तालिका सभापतींनी सांगितलं. पक्षातरांच्या बाबतीत घेतलल्या आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांनी पक्षांतर केलं तर ते अपात्र ठरणार नाही. या पदाला तशी सूट ही कायदयात देण्यात आलेली आहे असंही डावखरे यांनी स्पष्ट केलं. निलम गोऱ्हे यांनी 14 मे 2020 पासून ज्या पक्षाला पाठिंबा दिला आहे तो पक्ष बदलला नाही. चिन्ह आणि नाव हे त्याच पक्षाचे आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निलम गोऱ्हे कायम राहतील. त्यांनी पक्षांतर केलं अशी तरतूद किंवा नियम आढळून येत नाही. म्हणून उपसभापती म्हणून गोऱ्हे यांचे संविधानिक तरतूदीनुसार अधिकार अबाधीत राहतील असंही निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांची काय होती मागणी
आमदार निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांच्या विरोधात त्यांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून विधान भवन सचिवांना पत्र देण्यात आलं होतं. पक्षांतर केल्याने नीलम गोऱ्हे यांनी खुर्चीवर बसू नये अशी भूमिका असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं. निलम गोऱ्हे यांना नैतिक दृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं.
निलम गोऱ्हे शिंदे गटात
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारण सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेृत्तात शिवसेना योग्य मार्गावर चालली आहे. महिला विकास आणि देशविकासाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय आपण घेतल्याचं निलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिला आहे, की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा अधिकृत पक्ष आहे. केंद्रीय स्तरावर एनडीए आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचं मंदिर, तलाकपीडित महिलांना न्याय, काश्मिरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरि कायद्याबाबत सकारात्म पावलं उचलली आहेत. शेतकरी, महिलांच्या प्रश्नावर काम करत आहेत. त्यामुळे मी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन करत आहे असं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.