अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला...

Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.  महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसू नये यासाठी भाजपनं योग्य ती खबरदारी घेणं सुरू केलंय.

राजीव कासले | Updated: Sep 24, 2024, 09:27 PM IST
अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला... title=

नागपूरहून अमर काणेसह विशाल करोळे झी मीडिया संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढलेत. गणेशोत्सवात अमित शाह मुंबईत आल्यानंतर ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा अतिशय महत्वपूर्ण आहे. शहांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपची संघटनात्मक बैठक पार पडली. लोकसभेला भाजपाला विदर्भातून कमी जागा मिळाल्यानं या बैठकीत शहांनी काही कार्यकर्त्यांना कानमंत्र तर काहींची कानउघाडणी केलीय.

महायुतीला विदर्भात 45 चं टार्गेट

महायुतीने विदर्भात 45 जागांचं टार्गेट ठेवलं असून प्रत्येक बूथवर दहा टक्के मतदान वाढवा,असे आदेश अमित शहांनी दिलेत. नेता हा कार्यकर्ता असतो , त्यामुळे कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, नेत्यांनी बुथवर जाऊन काम करा,असे आदेश शहांनी दिलेत. प्रत्येक बूथवर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष ठेवा,त्यांना जोडण्याचे प्रयत्न करा, तसेच आजी-माजी सरपंचावर लक्ष केंदीत करा, गटबाजी खपवून घेतली जाणार नाही उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी बिलकूल सहन करणार नाही,अशी तंबीही शहा यांनी दिलीय. विजयादशमी ते धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बुथवर तरूण कार्यकर्ते फिरलेच पाहिजेत,असे आदेशही शहांनी दिलेत

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे शहांची छत्रपती संभाजीनगरमध्येही बैठक घेत आढावा घेतला. शहांच्या दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर चर्चा होणार आहे. महायुतीमध्ये 80 टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची चर्चा आहे. मात्र,काही जागांवर मतभेद असल्यानं अमित शहांच्या यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. याशिवाय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा होणार आहे.

महायुतीच्या जागावाटपावर होणार शिक्कामोर्तब ?

- भाजप 150 ते 155 जागा लढण्यावर ठाम आहे

- तर शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण 130 ते 135 जागा सोडण्यास भाजप तयार आहे.

- सोमवारी सागर बंगल्यावर झालेल्या कोअर कमिटी बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती

- डेंजर झोनमधील जागांची जबाबदारी मोठया नेत्यांवर दिल्याची माहिती आहे

- मित्रपक्षांशी समन्वय, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि निवडणुकीच्या तयारीबाबत कोअर कमिटी बैठकीत चर्चा झालीय

अमित शहा यांच्या विभागवार बैठकीनंतर नवरात्रीत महायुतीकडून जागावाटपाची घोषणा होऊ शकते. लोकसभेनंतर महाराष्ट्रात जवळपास पाच महिन्यांतर विधानसभा निवडणुका होतायेत. आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा-ओबीसींचा अद्याप संघर्ष सुरू आहे. लोकसभेच्या पराभवानंतर अमित शहांनी 'मिशन महाराष्ट्र' हाती घेतल्यानं या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.