विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?

Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.

राजीव कासले | Updated: Sep 24, 2024, 08:51 PM IST
विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात? title=

ओम देशमुखसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti) जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात काँग्रेस तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेल्या प्रिया दत्त (Priya Dutt) कमबॅकच्या तयारीत आहेत.

यंदा प्रिया दत्त यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही. मात्र आता वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याचं दिसतंय. वांद्रे पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे आशिष शेलार. तेव्हा जर प्रिया दत्त यांना उमेदवारी दिल्यास आशिष शेलार यांच्यापुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

कोण आहेत प्रिया दत्त?

प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत. 2005 आणि 2009 मध्ये प्रिया दत्त या खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या. प्रिया दत्त या स्वर्गीय सुनिल दत्त यांच्या कन्या आहेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघात स्वर्गीय सुनिल दत्त यांना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रिया दत्त यांना विधानसभेसाठी मविआ रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतलीये. यावेळी वर्षा गायकवाड यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांनी आजपर्यंत वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.. तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे 2014 पासून या मतदारसंघाच नेतृत्व करत आहेत.. बाबा सिद्दीकी महायुतीसोबत गेल्यानं काँग्रेस या मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्या रुपानं तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.

वांद्रे विधानसभा मतदारसंघ

2009 मध्ये वांद्रे पश्चिममधून बाबा सिद्दीकी काँग्रेसकडून आमदार होते. 2014 मध्ये भाजपकडून आशिष शेलार हे 74 हजार 779 मतं घेऊन विजयी झालेत. त्यांनी बाबा सिद्दीकी यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये पुन्हा भाजपकडून आशिष शेलार हे 74 हजार 816 मतं घेऊन दुस-यांदा विजयी झालेत. 2024 मध्ये आशिष शेलार विरुद्ध प्रिया दत्त असा सामना रंगण्याची शक्यता. प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारंसघातून निवडणूक लढणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.

आशिष शेलार विजयाची हॅटट्रीक करणार?

आशिष शेलार यांच्या विजयाची हॅट्रीक हुकवण्यासाठी काँग्रेसकडून नवी खेळी खेळली जात आहे.. त्यामुळे मविआच्या जागावाटपात वांद्रे पश्चिम मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार का? आणि प्रिया दत्त विरुद्ध आशिष शेलार अशी बिग फाईट रंगणार का, हे पाहणं गरजेचं आहे.