विधानसभेसाठी भाजपचं मिशन '125' , 'एक नेता, एक जिल्हा' धोरण राबवणार

Maharashta Politics : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सावधपणे पावलं टाकत आहे. तसेच यासाठी भाजपनं विशेष रणनिती देखील आखलीय

राजीव कासले | Updated: Aug 28, 2024, 10:32 PM IST
विधानसभेसाठी भाजपचं मिशन '125' , 'एक नेता, एक जिल्हा' धोरण राबवणार title=

उर्वशी खोना, झी मीडिया, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पराभव भाजपला जिव्हारी लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीतील चूका टाळत भाजपनं (BJP) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election 2024) कंबर कसलीय. काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीपासून दूर असलेला संघही विधानसभा निवडणुकीसाठी सक्रिय झालेला आहे. आगामी विधानसभेसाठी भाजपचं मिशन 'सव्वाशे पार' ठरलेलं आहे अशी माहिती मिळतेय.  तसेच यासाठी भाजपनं विशेष रणनिती देखील आखलीय. भाजपचे मोठे नेते मिशन 125 च्या कामाला लागले आहेत,अशीही सूत्रांची माहिती आहे

विधानसभेसाठी भाजपचं मिशन'125'
50 जागांवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात असा भाजपाचा अंदाज आहे. उर्वरित 75 जागांसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. 75 जागांची जबाबदारी प्रमुख नेत्यांना दिली जाणार आहे. 'एक नेता, एक जिल्हा' धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणूक रणनीती ठरवली जाणार आहे.  ग्राउंड झिरोवर काम करत रिझल्ट मिळवणार. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली असली तरीही त्यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना टार्गेट करत आहेत. 
तर बदलापूरची घटनेमुळे सर्वसामान्य जनतेत संतापाचं वातावरण आहे. त्यातच आता सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे अजित पवारांना महायुतीत घेतल्यांमुळे भाजपचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज आहेत. अशा परिस्थितीत भाजपचं सव्वाशे पार पूर्ण करण्याचं मोठं आव्हान आहे.

उमेदवारांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब
मुंबईतील विधानसभेच्या जागांसाठी भाजप उमेदवारांच्या नावांवर येत्या 2 ते 3 दिवसांत शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतंय. भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. एकंदरीत विधानसभेच्या दृष्टीनं भाजपकडून वेगवान हालचाली सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून 30 ऑगस्टला मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.