Maharashtra Politics : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार (Ajit Pawar) गटातील आमदार आणि मंत्री रविवारी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेण्यासाठी आले होते. बंडखोर गटाने शरद पवार यांचे आशीर्वाद मागितले आणि मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी झालेल्या संवादाची माहिती दिली. फूटीनंतर तब्बल 14 दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आतमध्ये नेमकं काय घडलं याबाबत भाष्य केले आहे.
"मला अचानक सुप्रिया सुळेंचा फोन आला आणि शरद पवार यांनी तातडीने बोलवलं आहे असं सांगितले. याठिकाणी राष्ट्रवादीमधून सत्तारुढ पक्षाच्या बाजूला जाऊन शपथ घेतलेले मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. त्यांनी शरद पवार यांच्याकडे झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. याच्यातून काहीतरी मार्ग काढा अशी विनंती त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही," असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
"आम्ही याबाबत भूमिका घेतलेली आहे. त्यांनी आता जे येऊन शरद पवार यांना भेटणे अनपेक्षित आहे. याबाबत आम्ही कधीही विचार केला नव्हता. त्यावर आता भाष्य करणे योग्य वाटत नाही. शरद पवार यांच्यासोबत याबाबत चर्चा होईल. आम्ही सरकारला समर्थन दिलेले नाही. त्यामुळे तशाच प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी आमच्या बसण्याची व्यवस्था करावी. अचानकपणे ते येऊन भेटले आहेत. त्यामुळे त्यामागचा कोणाचा काय उद्देष आहे आज सांगणे अवघड आहे. पण त्यांनी दिलगिरी व्यक्त करत खेद व्यक्त केला," असेही जयंत पाटील म्हणाले.
वेळ न मागताच शरद पवार यांची भेट घेतली - प्रफुल्ल पटेल
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी भेटीमागील नेमकं कारण सांगितलं आहे. "आमचं सर्वांचं दैवत, नेते आदरणीय शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही वेळ मागितली नव्हती. आम्ही सर्व अजित पवारांच्या घरी होतो, त्यावेळी आम्हाला शरद पवार बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरला आल्याची माहिती मिळाली होती. म्हणून संधी साधून आम्ही आलो होतो," अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
"शरद पवारांच्या पाया पडत आम्ही आशीर्वाद मागितले. आम्हा सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. पण राष्ट्रवादी एकसंघ कसा राहील याच्यासाठीही त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांन आमची मंत. विचार, विनंती ऐकून घेतली," असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.