Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 1 मे 1960 पासून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. गेली सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्याभोवती फिरत आहे. सत्तेत असो वा नसो, बहुमतात असो वा नसो, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार 'फॅक्टर' हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. तीनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषणवणाऱ्या शरद पवार यांनी अनेकदा आपल्या भाषणांनी विधानभवनाचे सभागृह गाजवलं होतं. मात्र दिल्लीत गेल्यानंतर शरद पवार महाराष्ट्राच्या विधानभवनापासून दुरावल्याचे पाहायला मिळाले. मात्र आजचा दिवस काहीसा वेगळा ठरला आहे.
गुरुवारी तब्बल 29 वर्षांनी शरद पवार विधिमंडळात दाखल झाले आहेत. 29 वर्षांनंतर शरद पवार हे मुंबईत विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बसले आहेत. याचं कारण ठरलं आहे त्यांच्यात पक्षात पडलेली फूट. गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी ऐकण्यासाठी आज खुद्द शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेही हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत नातू रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे देखील उपस्थित आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अपात्रता प्रकरणाच्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची उलटतपासणी होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 31 जानेवारीच्या मुदतीचे पालन करण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. दोन्ही बाजूंचे साक्षीपुरावे आणि युक्तिवादाचे काम 22 ते 27 जानेवारी दरम्यान होणार आहे. सुनावणी पूर्ण झाल्यावर निकालपत्र तयार करण्यासाठी नार्वेकर यांच्याकडे चार दिवसांची वेळ मिळणार आहे. त्यामुळे साक्षीपुरावे व युक्तिवाद दिलेल्या मुदतीत पूर्ण झाले नाहीत, तर निर्णयास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.