शिवसेना शिंदेंची, राष्ट्रवादी कुणाची? आता राष्ट्रवादीप्रकरणाचा निकाल लागणार

Maharashtra Politics : शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. आता राष्ट्रवादीचं प्रकरण नार्वेकरांसमोर येणार आहे. येत्या 31 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची की अजित पवारांची याचा फैसला होणार आहे.

Updated: Jan 11, 2024, 06:49 PM IST
शिवसेना शिंदेंची, राष्ट्रवादी कुणाची? आता राष्ट्रवादीप्रकरणाचा निकाल लागणार title=

Maharashtra Politics : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिला.  आता शिवसेनेचा निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घ्यावा लागणार आहे.. ही कार्यवाही 6 जानेवारीपासून सुरू झाली होती. 20 जानेवारीला साक्षीदारांची उलटतपासणी, तर 23 जानेवारीला प्रतिवादींची उलटतपासणी होणार आहे. अंतिम सुनावणी 25 जानेवारीला सुरू होईल आणि 27 जानेवारीला संपेल. त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर आपला निर्णय देतील. 

विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर अध्यक्षांवर निर्णय देतील मात्र त्याआधी निवडणूक आयोग राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय देतील. केंद्रीय निवडणूक आयोग येत्या आठवडाभरातच हा निर्णय येण्याची शक्यताय. राष्ट्रवादी कुणाची यावरून निवडणूक आयोगात सुनावणी संपली होती. लेखी सबमिशनसाठी वेळ दिला होता. आता प्रतीक्षा निकालाची असेल. 

अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि शरद पवार गटानं (Sharad Pawar Group) एकमेकांवर बनावट शपथपत्र सादर केल्याचा आरोप केलाय. सुनावणीदरम्यान अजित पवार गटानं शरद पवारांच्या कार्यप्रणालीवरही आक्षेप घेतले होते, त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. आता नार्वेकरांसमोर राष्ट्रवादी कुणाची याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेंची तर राष्ट्रवादी कुणाची याची चर्चा सुरु झालीय.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा काय निकाल?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं कौल दिला. शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिलाय. विधीमंडळ पक्षाचं बहुमत हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं असल्यामुळे त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं नार्वेकरांनी आपल्या निकालात नमूद केलंय. त्यामुळे एकनाथ शिदेंचं मुख्यमंत्रिपद अबाधित आहे. तर शिवसेना शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांचे आमदार पात्र असल्याचा निकालही त्यांनी यावेळी दिला.शिवसेनेच्या 1999 च्या घटनेनुसार पक्षप्रमुखाला नव्हे तर प्रतिनिधी सभेलाच सर्वोच्च अधिकार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना पक्षातून काढण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नसल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.  

ठाकरे गटाची भूमिका
आमदार अपात्रता निकालाविरोधात आता शिवसेना ठाकरे गटानं रणनीती आखलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल कसा अन्यायकारक आहे हे ठाकरे गट जनतेत जाऊन मांडणार आहे, त्यासाठी लवकरच कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मातोश्रीवर ठाकरे गटाच्या दिग्गजांची यासंबंधी बैठक झाली, लवकरच कार्यक्रमाची रुपरेषा आखली जाणार आहे.. कोर्टात लढाई सुरु असताना जनतेत जाऊन निकाल पोहचवण्याचं काम ठाकरे गटाचे नेते करणार आहेत, 26 जानेवारीपासून नेत्यांचे पुढचे दौरे सुरु होणार आहेत.