बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न?

Maharashtra Politics : भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवंनवे 'प्रयोग' करण्यास सुरुवात केलीये. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे बंद लिफाफा पद्धत सुरु केलीये.

राजीव कासले | Updated: Oct 2, 2024, 08:33 PM IST
बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न? title=

विशाल करोळेसह ओम देशमुख आणि श्रीकांत राऊत, झी मीडिया : लोकसभेतल्या निकालापासून (Loksabha Election 2024) धडा घेत आता विधानसभेसाठी भाजपनं (BJP) कंबर कसलीये. उमेदवार निवडताना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत भाजपकडून नवा फंडा राबविण्यात येतोय. तो म्हणजे बंद लिफाफा पॅटर्न (Lifafa Patern). या बंद लिफाफ्यानुसारच वरिष्ठांना अहवाल दिला जाणार आणि भाजपचा उमेदवार ठरणार आहे..

काय आहे बंद लिफाफा पॅटर्न?

भाजपाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निरीक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. निरिक्षक संबंधित विधानसभा मतदासंघात जाणार. उमेदवारीसाठी इच्छुकांच्या संख्येचा आढावा घेतला जाणार. कोणता उमेदवार असावा, त्याचं नाव पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात ठेवलं जाणार. इच्छुकांची 3 नावे बंद लिफाफ्याद्वारे वरिष्ठांना सादर केली जाणार आहेत. बंद लिफाफ्यातील नावानुसार उमेदवार ठरविला जाणार आहे. भाजपकडून सध्या 150 विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

गोवा आणि बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीत राबविलेला हा बंद लिफाफा पॅटर्न भाजपकडून आता महाराष्ट्रात अंमलात आणला जात आहे. भाजपकडून संभाजीनगर पूर्व विधानसभा, गंगापूर-खुलताबाद आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून प्रमुख 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात उमदेवारांची नावे मागवून घेतलीये.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं बंद लिफाफा पॅटर्न मधून नाराजी टाळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र, यामधून प्रस्थापित उमेदवाराविरोधात नाराजीचा सूरही उमटण्याची दाट शक्यता आहे, आणि यातून गोंधळही वाढू शकतो. त्यामुळे हा पॅटर्न कितपत यशस्वी होतो, हे निवडणुकीनंतरच कळणार.

भाजपची जोरदार तयारी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरूये. भाजपने प्रत्येक विधानसभेतील मतदारसंघासाठी प्रभारी नियुक्त केलेत. नाशिकमध्ये याचा आढावा घेण्यास सुरूवात झालीये. नाशिक पूर्वसाठी चित्रा वाघ, नाशिक पश्चिमसाठी नंदु महाजन तर नाशिक मध्यसाठी खासदार स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आलीये. हे प्रभारी मतदारसंघात भाजपची स्थिती, नागरिकांची मतं त्याचबरोबर नागरी आणि पायाभूत सुविधांविषयी माहिती करून घेणारेत.

जागावाटपावर महत्त्वपूर्ण चर्चा

दरम्यान, सागर बंगल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. दोघांमध्ये जवळपास दीड तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री फडवणीस आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपासंदर्भात ज्या काही बैठका झाल्या ,त्याचा आढावा अमित शहा यांनी यावेळी घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. भाजप अंदाजे किती जागा लढवू शकते या विषयी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय.