मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने कामावर हजर राहाण्याचं आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
सोमवारपर्यंत कामावर हजर राहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जा, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. अल्टीमेटमनंतरही कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आजपासून कारणे दाखवा नोटीस देण्यासही सुरुवात केल्याची माहिती आहे. सेवेतून बडतर्फ का करु नये? यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीस दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठ दिवसांची मुदत दिली जाणार आहे.
कशी असेल बडतर्फ प्रक्रिया
- निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुनावलीला बोलावलं जातं.
- कर्मचाऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी दिला जातो.
- कर्मचारी जर गैरहजर राहिला तर त्याला तीन संधी दिल्या जातात.
- सुनावणीसाठी बोलावल्यानंतर ते सातत्याने गैरहजर राहिले तर त्यांच्या नावे ७ दिवसाची बजतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली जाते
यामध्येही कर्मचारी गैरहजर राहिल्यास सात दिवसानंतर एसटी प्रशासन त्यांना बडतर्फ केल्याची कायदेशीर सूचना फलकावर प्रसिद्ध करते.
विलीनीनकरणाचा निकाल २० तारखेला?
२० तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल, असं एसटी कर्मचाऱ्यांना भडकवलं जात आहे. दिशाभूल करुन संप भरकटवला जात असल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. विलीनकरणाचा मुद्दा समितीच्या माध्यमातूनच सुटणारआहे, तोपर्यंत कामावरती या असं आवाहन अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे
कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे दहा हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन झाल आहे, याच्या पुढची कारवाई ही बडतर्फीची असेल त्यासाठी सरकार निर्णय घेईल असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.